Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा बहुचर्चित दोन दिवसांचा भारत दौरा हा गुरुवार ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या दौऱ्यादरम्यान पुतिन त्यांच्या अधिकृत कारमधून प्रवास करतील. ती कार कोणती आहे? आणि ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'बीस्ट' (Beast) नावाच्या कारपेक्षा वेगळी कशी आहे? याविषयी जाणून घेऊ या...
रशियाची राष्ट्राध्यक्षांसाठी असलेली अधिकृत सरकारी कार 'ऑरस सेनेट लिमोझिन' (Aurus Senat Limousine) आहे. २०१८ मध्ये पुतिन यांच्या चौथ्या शपथविधीवेळी ही कार प्रथमच वापरली. या कारने जुन्या मर्सिडीज बेंझ एस ६०० गार्ड पुलमनची जागा घेतली. पुतीन यांच्यासाठीची खास कार रशियन ऑरस मोटर्सने तयार केली आहे. सध्याचे मॉडेल एक 'आर्मर्ड L700 लिमोझिन' आहे. या कारला 'रशियन रोल्स-रॉयस' असेही म्हणतात, कारण ती रोल्स-रॉयस (Rolls-Royce) आणि बेंटले (Bentley) या कारचे मिश्रण आहे. विशेष म्हणजे रशियातील सामान्य लोकांसाठी देखील ती उपलब्ध आहे.
पंतप्रधान मोदींनी केली होती एक्स पोस्ट सप्टेंबर २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील तियानजिन येथे त्यांच्या द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी जाण्यासाठी पुतिन यांच्या कारमधून प्रवास केला होता. "राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि मी आमच्या द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी एकत्र प्रवास केला. त्यांच्यासोबतची चर्चा नेहमीच ज्ञानवर्धक असते," असे पंतप्रधान मोदींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले होते.
NAMI ने डिझाइन आणि विकसित केलेल्या रशियाच्या 'कोर्टेज' (Kortezh) लक्झरी वाहन मालिकेचा भाग म्हणून ऑरस मोटर्सने ही कार बनवली आहे. सुरुवातीला या कारमध्ये ४.४ लिटर क्षमतेचे ट्विन टर्बो V८ इंजिन आहे, जे सुमारे ५९८ हॉर्सपॉवर (hp) पॉवर निर्माण करते. यात नऊ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. याचे V१२ हायब्रीड व्हर्जन देखील विकसित केले गेले आहे. ही कार सुमारे सहा सेकंदांत ० ते १०० किमी/तासचा वेग पकडू शकते आणि तिचा कमाल वेग सुमारे २४९ किमी/तास आहे.
ही कार शस्त्रभेदी गोळ्या (Armour-piercing bullets) आणि ग्रेनेड हल्ल्यांना तोंड देऊ शकते. यात पंक्चर झाल्यावरही चालणारे टायर, मजबूत काच (६ सेमी जाड), आपत्कालीन दरवाजे आणि रशियाच्या फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसच्या मानकांनुसार बनवलेली सुरक्षा आहे. सुमारे ७ मीटर लांब आणि अनेक टन वजनाची ही कार 'चाकांवरील किल्ला' म्हणून डिझाइन केली गेली आहे. अतिरिक्त ऑक्सिजनमुळे ती रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षण देऊ शकते. यात आग विझवण्याची प्रणाली आहे आणि ती VR10 बॅलिस्टिक मानकसाठी संमिश्र सामग्रीने मजबूत केली आहे. यात एक मिनी कमांड सिस्टम देखील आहे.
'बीस्ट' (The Beast) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची लिमोझिन आहे. हिला 'कॅडिलॅक वन' किंवा 'फर्स्ट कार' असेही म्हणतात. २०१४ मध्ये हिचे काम सुरू झाले आणि २०१८ मध्ये ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ती अधिकृतपणे सेवेत दाखल झाली. जनरल मोटर्सने (General Motors) तिचे उत्पादन केले आहे. तिची किंमत सुमारे $१ ते $१.५ दशलक्ष (सुमारे ८.३ कोटी ते १२.४ कोटी रुपये) इतकी आहे.
यात लेदरची सीट, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी जागा, कधीकधी फोल्ड-आउट डेस्क आणि उच्च-स्तरीय संपर्क आहे. सहसा C-17 सारख्या लष्करी मालवाहू विमानाने परदेशात नेली जाते. ट्रम्प आणि बायडेन या दोघांनीही २०२० च्या शपथविधीदरम्यान ही कार वापरली होती. या कारचे Duramax 6.6L V8 डिझेल इंजिन आहे. हॉर्सपॉवर (hp) अंदाजे २१४ ते ३०० hp आहे. तिचा कमाल वेग हा सुमारे (९६-११२ किमी/तास) आहे. या कारच्या काही वैशिष्ट्ये गोपनीय ठेवली जातात.
'बीस्ट' मध्ये सुमारे ८ इंच जाड आर्मर आणि ३ इंच जाड बॅलिस्टिक काच आहे. यात नाईट-व्हिजन सिस्टम्स, इलेक्ट्रिक दरवाजाचे हँडल आणि सुरक्षित संपर्क साधने आहेत. अणु-प्रक्षेपण कोड पाठवण्याची क्षमता देखील यामध्ये आहे. या कारचे वजन सुमारे २०,००० पाउंड (९,००० किलो) आहे. एनबीसीच्या (NBC) अहवालानुसार, तिचा आर्मर ॲल्युमिनियम, सिरॅमिक आणि स्टीलचा बनलेला आहे. यात अश्रुधुराच्या तोफा, नाईट-व्हिजन आहे आणि अफवा आहे की यात स्मोक स्क्रीन (धुराचा पडदा) देखील आहे, ज्यामुळे तिची हालचाल लपवता येते. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी राष्ट्राध्यक्षांच्या रक्ताचा साठा कारमध्ये असतो. सात लोक बसण्याची क्षमता आहे. पेंटागॉन तसेच उपराष्ट्रपतींशी संपर्क साधण्याची प्रणाली यामध्ये आहे.
'बीस्ट'चा मुख्य उद्देश सुरक्षा आहे, त्यामुळे ती वेगात थोडी मागे पडते. 'ऑरस सेनेट' लक्झरी (ऐषाराम) आणि सुरक्षेसोबत वेग (स्पीड) यावर भर देते. 'बीस्ट' मध्ये इतर कोणालाही प्रवेश मिळत नाही. दशकभरात अमेरिकेच्या भूमीवरील पहिल्या दौऱ्यादरम्यान पुतिन यांनी अमेरिकेच्या सरकारी कारमधून प्रवास केला होता. तर, २०२४ च्या सुरुवातीला रशियन राष्ट्राध्यक्षांनी किम जोंग उन यांना दोन 'ऑरस सेनेट' भेट दिल्या होत्या.