

Vladimir Putin Visit India:
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे ४ आणि ५ डिसेंबरला भारत दौऱ्यावर असणार आहेत. याबाबतची घोषणा परराष्ट्र मंत्रालयानं आज (दि. २८ नोव्हेंबर) केली. पुतीन यांचा हा दौरा भारत - रशिया वार्षिक बैठकीसाठी होणार आहे. यावेळी पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वार्षिक बैठकीसाठी रशियाला गेले होते.
पुतीन यांच्या या भारत दौऱ्यावेळी दोन्ही देशांमधील द्वीपक्षीय संबंधांचा लेखाजोखा मांडला जाईल. अमेरिका रशियाकडून इंधन न घेण्यासाठी जगातील अनेक देशांवर दबाव वाढत आहे. ट्रम्प प्रशानसाच्या या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या यंदाच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे. पुतीन यांनी २०२१ मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता.
पतीन यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील विशेष रणनैतिक भागीदारी अजून मजबूत करण्याची आणि सध्याच्या जागतिक आणि आशियातील परिस्थितीबाबत एकमेकांची मते जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील पुतीन यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जेवणाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे. पुतीन हे भारतात २४ तासापेक्षा जास्त काळ असणार आहेत.
जाणकारांच्या मते ऑगस्ट महिन्यापासून भूराजनैतिक आणि जागतिक आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. त्यामुळे रशिया आणि भारत यांच्यात व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण वाढवण्याच्या दृष्टीने पुतीन यांच्या या दौऱ्याला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.
याचबरोबर पुतीन दिल्लीतील आपल्या सर्व कार्यक्रमातून वेळ काढून रशिया टीव्हीची भारतीय वृत्तवाहिनी देखील लाँच करण्याची शक्यता आहे. RT हा रशिया सरकारकडून चालवला जाणारा चॅनल आहे.
पुतीन यांच्या या भारत भेटीदरम्यान रशिया आणि भारत यांच्यातील लष्करी सहकार्य देखील वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत अजून एक-४०० डिफेन्स सिस्टमची ऑर्डर रशियाला देऊ शकतो. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या सिस्टमनं उत्तम कामगिरी बजावली होती. भारतानं २०१८ मध्ये पाच एस ४०० डिफेन्स सिस्टम ऑर्डर केल्या होत्या. त्यातील तीन सिस्टम आतापर्यंत मिळाल्या आहेत.