पुढारी ऑनलाईन डेस्क : तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असणार्या रशिया- युक्रेन युद्धाला विराम देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) पुन्हा एकदा सरसावले आहेत. युद्धविरामासाठी मी मंगळवार, १८ मार्च रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करेन, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. रविवारी संध्याकाळी 'एअर फोर्स वन' विमानाने फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Russia- Ukrain war)
यावेळी ट्रम्प म्हणाले की, " रशिया- युक्रेन युद्धाबाबत मंगळवारपर्यंत आमच्याकडे काही घोषणा करायची आहे का ते पाहूया. मी मंगळवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलेन. आठवड्याच्या शेवटी खूप काम झाले आहे. आता आम्हाला हे युद्ध संपवता येते का ते पहायचे आहे. युद्ध संपवण्यासाठी जमीन आणि वीज प्रकल्प वाटाघाटीचा भाग आहेत. आपण जमिनीबद्दल बोलू आपण पॉवर प्लांट्सबद्दल बोलू."
युरोपमधील मित्र राष्ट्रे ट्रम्प यांची पुतिन यांच्याशी वाढत्या जवळीक आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याबद्दलच्या कठोर भूमिकेमुळे युरोपमधील राष्ट्रांनी यामुद्यावर सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, ट्रम्पचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी अलीकडेच वाटाघाटी पुढे नेण्यासाठी मॉस्कोला भेट दिली आणि रविवारी त्यांनी सुरुवातीला सांगितले की ट्रम्प आणि पुतिन यांच्यात लवकरच फोनवर चर्चा होवू शकते, असे मानले जात आहे. या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.