केज (जि. बीड) ; पुढारी वृत्तसेवा : बाणेगाव येथे विहिरीत पडलेल्या आपल्या मुलीला वाचवायला धावून विहिरीत उडी घेतलेल्या मातेचा तिच्या चिमुकलीसह मृत्यू झाला. विशेष म्हणजे विहिरीतून पाण्याबाहेर काढल्यानंतर मुलगी आईच्या कुशीत आढळून आली.
या बाबतची माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील वडजी ता. वाशी येथील शिक्षिका असलेल्या आशा सूंदर जाधवर ही दोन दिवसांपूर्वी माहेरी आली होती. त्यांचा मृतदेह दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परंतु माय लेकीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बाणेगाव (ता. केज) येथे घडलेल्या घटनेतील आशा सुंदर जाधवर (२२ वर्ष) व कु. शांभवी सुंदर जाधवर (दीड वर्ष) अशी त्या मायलेकींची नावे आहेत. आशा जाधवर यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह सुंदर जाधवर (रा. वडजी ता. वाशी जि. उस्मानबाद) यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता.
आशा जाधवर व सुंदर जाधवर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात वास्तव्यास होते.
वर्षभरापूर्वी सुंदर जाधवर यांना कोरोनाची लागण झाली होती. यातच उपचारा दरम्यान सुंदर जाधवर त्यांचे निधन झाले. पती सुंदर जाधवर यांच्या जाण्याने आशा जाधवर विरहात होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या त्यांची दीड वर्षाची चिमुकली मुलगी शांभवीसह त्या माहेरी बाणेगावला आल्या होत्या.
दि. १६ सप्टेंबर रोजी आशा जाधवर यांचे वडील बाहेरगावी गेले होते. तर आई शेती कामात व्यग्र होती. दुपारी चार वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा जाधवर या शेतात गेल्या.
यावेळी खेळता-खेळता शांभवी ही विहिरीजवळ गेली व विहिरीत पडली. शांभवी विहिरीत पडताच आशा जाधवर यांनी तिला वाचविण्यासाठी स्वतः विहिरीत उडी मारून मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात दोघींचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने पाच विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करून प्रेत पाण्याबाहेर काढले गेले.
त्यावेळी माय लेकीचे मृतदेह आढळून आले. या वेळी आशा यांच्या कडेवर मुलगी शांभवी होती तर शांभवीचा हात आईच्या हातात होता.
केज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे, उपनिरीक्षक दादासाहेब सिध्दे , जमादार जसवंत शेप, रशीद शेख यांनी धाव घेत दि.१६ रोजी रात्री उशिरा मायलेकीचे मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
१७ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोघी मायलेकींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत. अधिक तपास सुरु असल्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले.
हे ही वाचलं का?
[visual_portfolio id="39086"]