ईंडहोव्हन; वृत्तसंस्था : एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला नेदरलँडकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला. यजमान संघातर्फे पेपिन, बुखार्दत यांनी प्रत्येकी 1 तर ड्युको टेल्गेनकॅम्पने दोन गोल नोंदवत संघाच्या एकतर्फी विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताचा एकमेव गोल हरमनप्रीत सिंगने 11 व्या मिनिटाला केला. (Hockey Pro League)
लंडनमध्ये गत आठवड्यात उत्तम खेळ साकारणार्या भारतीय पुरुष हॉकी संघाने येथे पहिला गोल नोंदवत उत्तम सुरुवात केली होती. प्रतिस्पर्धी संघाने जाणूनबुजून फाऊल केल्याने भारताला पेनल्टी बहाल करण्यात आली आणि बहरातील हरमनप्रीतने याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अजिबात कसर सोडली नाही. मात्र, नंतर नेदरलँडने आक्रमक खेळाची प्रचिती देत सारी समीकरणे बदलून टाकली.
घरच्या चाहत्यांचे पाठबळ असल्याने याचा नेदरलँड संघाला उत्तम लाभ झाला. दुसर्या सत्रात पेपिनने यजमान संघाला बरोबरी प्राप्त करून दिली. 1-1 अशा कोंडीसह तिसर्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर नेदरलँडने आक्रमक खेळावर भर दिला. बॉल पझेशनच्या आघाडीवर त्यांनी उत्तम वर्चस्व गाजवले, याचाही त्यांना लाभ झाला. एकदा पिछाडीवर फेकले गेल्यानंतर भारताकडून फारसा प्रतिकार झाला नाही आणि अंतिमत: नेदरलँडने 4-1 असा सहज विजय मिळवला. (Hockey Pro League)
हेही वाचा;