WTC Final 2023 : शतकवीर स्मिथ-हेड भारताच्या मुळावर!; ऑस्ट्रेलिया सर्वबाद ४६९, भारत ५ बाद १५१ | पुढारी

WTC Final 2023 : शतकवीर स्मिथ-हेड भारताच्या मुळावर!; ऑस्ट्रेलिया सर्वबाद ४६९, भारत ५ बाद १५१

लंडन; वृत्तसंस्था : शतकवीर स्टीव्ह स्मिथ व ट्रॅव्हिस हेड यांनी चौथ्या गड्यासाठी 285 धावांची तगडी भागीदारी साकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या डावात सर्वबाद 469 धावांपर्यंत मजल मारली. ट्रॅव्हिस हेडने 174 चेंडूंत 25 चौकार, 1 षटकारासह सर्वाधिक 163 तर स्टीव्ह स्मिथने 268 चेंडूंत 19 चौकारांसह 121 धावांची तडाखेबंद शतकी खेळी साकारली. प्रत्युत्तरात भारताची दुसर्‍या दिवस अखेर 5 बाद 151 अशी दाणादाण उडाली. दिवसअखेर अजिंक्य रहाणे 29 तर के. एस. भरत 5 धावांवर खेळत होते. (WTC Final 2023)

गुरुवारी या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ट्रॅव्हिस हेडने सिराजच्या गोलंदाजीवर आखूड टप्प्याच्या चेंडूवर यष्टीमागे झेल दिला. तो बाद झाल्यानंतर स्थिसह 285 धावांची भागीदारी देखील संपुष्टात आली. त्यानंतर ठराविक अंतराने गडी बाद होण्याचा सिलसिला सुरू झाला आणि ऑस्ट्रेलियाने 41 धावांत 4 फलंदाज गमावले. पण, स्मिथ-हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. (WTC Final 2023)

स्मिथची 121 धावांची खेळी त्याच्यासाठी कारकिर्दीतील 31 वी शतकी खेळी होती. त्याच्यासाठी इंग्लंडमधील हे सातवे शतक आहे. इंग्लंडमध्ये पाहुण्या संघातर्फे सर्वाधिक शतके झळकावण्याच्या निकषावर स्मिथ आता दुसर्‍या स्थानी पोहोचला असून सर डॉन ब—ॅडमन 11 शतकांसह अव्वलस्थानी विराजमान आहेत. (WTC Final 2023)

स्टीव्ह स्मिथने 2010 मध्ये लॉर्डस्वर पदार्पण नोंदवले असून 2013 मध्ये त्याने ओव्हलवर आपले पहिलेवहिले कसोटी शतक झळकावले. या मैदानावर त्याची आता 3 शतके आहेत. या धडाकेबाज फलंदाजाने 95 धावांवरून डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर केवळ 2 चेंडूंतच शानदार शतक साजरे केले. सिराजच्या गोलंदाजीवर त्याने लेगसाईडला लागोपाठ दोन चौकार फटकावत हा माईलस्टोन पार केला.

34 वर्षीय स्मिथने एकीकडे संयम व बचावाचा उत्तम मिलाफ साधला असताना दुसरीकडे, ट्रॅव्हिस हेड तितकाच विस्फोटक होता. त्याने 145 धावांवरून पुढे सुरुवात केल्यानंतर 163 धावांपर्यंत मजल मारली. हेड नंतर पूल करण्याच्या प्रयत्नात बाद झाला तर कॅमेरून ग्रीनने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेल दिला. मिशेल स्टार्क 7 धावांवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अंदाज चुकल्यानंतर धावचीत झाला. भारतीय संघातर्फे सिराजने सर्वाधिक 4 बळी घेतले.

पसंतीच्या ओव्हलवर स्मिथसाठी 4 सामन्यांतील तिसरे शतक

स्मिथसाठी लंडनमधील ओव्हलचे मैदान खास पसंतीचे ठरत आले असून येथे त्याने 4 सामन्यांत 3 शतके झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज फलंदाजाने आतापर्यंत 97 सामन्यांत 31 शतके झळकावली असून 2013 अ‍ॅशेस मालिकेत त्याने 12 व्या कसोटीत पहिले शतक साजरे केले होते. त्याने 2015 मध्ये अ‍ॅशेसमधील डेड-रबर लढतीत 143 धावांची खेळी साकारली. याशिवाय, चार वर्षांपूर्वी वर्षभराच्या ब—ेकनंतर 80 धावांची शानदार खेळी झळकावली. येथील निर्णायक फायनल लढतीत त्याने नेहमीच्या शैलीत खराब चेंडूंची प्रतीक्षा करण्यावर अधिक भर दिला.

भारताच्या नकारात्मक धोरणावर रवी शास्त्रींची टीका

पहिल्या दोन दिवसांच्या खेळात भारताच्या नकारात्मक धोरणावर रवी शास्त्री यांनी जोरदार टीका केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतरही फलंदाजी का घेतली नाही, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारताने या निर्णायक लढतीसाठी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला वगळले असून अष्टपैलू फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजासह चार मध्यमगती गोलंदाजांना खेळवण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर शास्त्री बोलत होते.

‘जर सकारात्मक धोरण असते तर भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली असती आणि पहिल्या सत्रात 250 धावांच्या आसपासपर्यंत मजल मारण्याचे लक्ष्य ठेवले असते. अगदी 250 धावांचा टप्पा शक्य झाला नसता तर त्या आसपास पोहोचले तरी खूप झाले असते. त्यानंतर मजल-दरमजल करत आणखी मजबूत स्थिती प्राप्त करता आली असती,’ असे शास्त्री याप्रसंगी म्हणाले.

ऑस्ट्रेलिया या लढतीत आता भरभक्कम स्थितीत असून भारताला बराच संघर्ष करावा लागू शकतो, याचा त्यांनी येथे उल्लेख केला. उर्वरित खेळात ऑस्ट्रेलियावर दडपण आणले तरच भारताला सामन्यात आव्हान उभे करता येईल. असे झाले नाही तर मात्र जिंकण्याची आशा-अपेक्षा सोडून द्यावी लागेल, असे ते म्हणाले.

स्टीव्ह स्मिथसमवेत फलंदाजीचा मी नेहमीच आनंद लुटत आलो असून आजचा दिवसही याला अपवाद नव्हता. स्मिथ आमचा सर्वोत्तम फलंदाज आहे आणि प्रतिस्पर्धी संघ त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याने याचा आम्हाला अधिक लाभ होतो.

– ट्रॅव्हिस हेड

ट्रॅव्हिस हेडने आक्रमक फलंदाजीवर भर दिल्याने माझ्यावरील जबाबदारी बरीच हलकी झाली. यामुळे मला माझ्या नैसर्गिक खेळावर पूर्ण भर देता आला. मला इंग्लंडमध्ये खेळणे नेहमीच आवडते. माझ्यासाठी हा हंगाम अधिक यशदायी ठरत जाईल, अशी अपेक्षा आहे.

– स्टीव्ह स्मिथ

हेही वाचा;

Back to top button