Trent Boult : न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आगामी वर्ल्डकपसाठी उपलब्ध | पुढारी

Trent Boult : न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आगामी वर्ल्डकपसाठी उपलब्ध

वेलिंग्टन; वृत्तसंस्था : न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट यंदा भारतात होणार्‍या वन डे विश्वचषक स्पर्धेसाठी उपलब्ध असेल आणि संघात त्याचा समावेशदेखील केला जाईल, अशी माहिती किवीज संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी गुरुवारी दिली. वास्तविक, बोल्टला गतवर्षी मुख्य करारातून मुक्त केले गेले होते. शिवाय, गुरुवारी जाहीर केल्या गेलेल्या करारबद्ध खेळाडूंच्या ताज्या यादीत देखील त्याचा समावेश नव्हता. मात्र, यानंतरही तात्पुरत्या स्तरावर खेळण्यास त्याने संमती दिली आहे, असे न्यूझीलंड क्रिकेटने जाहीर केले. (Trent Boult)

‘ट्रेंट बोल्ट जागतिक स्तरावरील सर्वोत्तम वन डे गोलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे, दुखापतीतून मार्ग काढत तो आगामी विश्वचषक स्पर्धेत ताज्या दमाने सहभागी होईल, खेळत राहील, असा विश्वास स्टीड यांनी व्यक्त केला. बोल्ट व टीम साऊदी मागील दशकभराच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात परस्परपूरक भेदक गोलंदाजी साकारत आले असून त्यांनी न्यूझीलंडला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून देण्यात व मागील दोन वन डे विश्वचषक स्पर्धेतील फायनलपर्यंत धडक मारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. मात्र, बोल्टने केलेल्या विनंतीला मान देत त्याला मागील ऑगस्टमध्ये मुख्य करारातून मुक्त करण्यात आले होते. बोल्टने त्यावेळी आपण कुटुंबाला अधिक वेळ देऊ इच्छितो, असे सांगितले होते. (Trent Boult)

आगामी विश्वचषक स्पर्धेनंतरही बोल्ट संघाच्या गरजेनुरूप उपलब्ध होऊ शकेल का, याची सध्या चाचपणी केली जात असून त्याच्या टी-20 लीग करारावर देखील बरेच काही अवलंबून आहे, असे गॅरी स्टीड याप्रसंगी म्हणाले. बोल्टने आतापर्यंत 317 कसोटी बळी घेतले असून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 250 पेक्षा अधिक बळी नोंदवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, कसोटी संघाचे दरवाजेदेखील उघडले जाऊ शकतात, असे सध्याचे संकेत आहेत. सध्या बोल्टशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तो लवकरच मुख्य प्रवाहात दाखल होईल, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.

2023-24 साठी न्यूझीलंडचे करारबद्ध खेळाडू : फिन अ‍ॅलन, टॉम ब्लंडेल, मायकल ब—ेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काईल जेमिसन, टॉम लॅथम, अ‍ॅडम मिल्ने, डॅरेल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनर, ईश सोधी, टीम साऊदी, ब्लेयर टिकनर, नील वॅग्नर, केन विल्यम्सन, विल यंग.

हेही वाचा; 

Back to top button