Latest

शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे निधन

backup backup

शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीष लक्ष्मण जाधव (वय ७५ ) यांचे मंगळवारी जयसिंगपूर येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार बुधवारी सकाळी १० वाजता, जयसिंगपूर येथील स्मशानभूमीत होणार आहेत.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान, लखुजीराजे जाधव प्रतिष्ठान, शाहीर परिषद यांसह राज्य आणि देशपातळीवरील विविध संस्था-संघटना तसेच शासन व खासगी ट्रस्टची वस्तू संग्रहालये, पुरातत्व विभागाच्या विविध समित्यांवर ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सक्रिय होते.

महाराष्ट्रातील गडकोट-किल्ल्यांचा त्यांचा सखोल व चौफेर अभ्यास होता. नव्या पिढीला गडकिल्ल्यांसह ऐतिहासिक वास्तूंची ओळख व्हावी, यासाठी अनेक मोहिमांमध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय होते. त्यांच्या या इतिहासाच्या कामाची दखल 'इपिक' सह विविध वाहिण्यांनी आवर्जुन घेतली होती.

ज्येष्ठ स्वतंत्र्य सैनिक ल. मा. जाधव यांचे ते चिरंजीव होत. मुंबईत प्रारंभी केमिकल इंजिनिअर व नंतर मार्केटिंग क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या गिरीश जाधव यांना इतिहाप्रेमातून दुर्मिळ शस्त्रास्त्रांच्या संग्रहाचा छंद जडला.

देशभर खेडोपाडी-गावोगावीतील जुन्या पुरातन वस्तूंचे बाजार फिरून त्यांनी शेकडो शस्त्रास्त्रांचा संग्रह केला. प्रसंगी व्यक्तीगत आणि कौटुंबिक आर्थिक गरजा बाजूला ठेवून त्यांनी गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी इतिहाकालीन शस्त्रास संग्रह, त्यांचा अभ्यास आणि संशोधनाचे व्रत जोपासले होते.

इतिहास कालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह आणि अभ्यास स्वत:पुरता मर्यादित न ठेवता, तो जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, भावी पिढीने यातून आदर्श घेवून राष्ट्राची संपत्ती असणाऱ्या या अनमोल ठेव्याचे जतन-संवर्धन-संरक्षण कार्यात सक्रिय सहभाग द्यावा, या उद्देशाने गिरीश जाधव यांनी आपल्याकडील संग्रहाचे प्रदर्शन मांडण्यास सुरुवात केली. 'शौर्य गाथा' या शिवकालीन शस्त्रास प्रदर्शनातून त्यांनी इतिहासाची अनोख्या पद्धतीने सेवा केली.

संपूर्ण जगाच्या आकर्षणाचा विषय असणाऱ्या शिवकालीन इतिहास व शस्त्रास्त्रांची परिपूर्ण माहिती देणारे केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस होता. प्रदीर्घ अभ्यास व संशोधनावर आधारित इतिहासकालीन शस्त्रास्त्रे या विषयावरील पुस्तक लेखनाचे काम ते सध्या करत होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT