AD Vs ED : महाराष्ट्रातील पाच सरकारच्या काळात २२ वर्षे मंत्रीपद भुषवलेल्या अनिल देशमुखांवर अटकेची वेळ का आली? | पुढारी

AD Vs ED : महाराष्ट्रातील पाच सरकारच्या काळात २२ वर्षे मंत्रीपद भुषवलेल्या अनिल देशमुखांवर अटकेची वेळ का आली?

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आणि मध्यरात्रीनंतर त्यांना अटक करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुली आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान अनिल देशमुख यांनी मागची २२ वर्षे वेगवेगळी मंत्रीपदे भुषवली आहेत. (AD Vs ED)

अनिल देशमुख यांना महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या गृहमंत्री पदावरून वाद सुरू झाला. तो ईडीने अटक करण्यापर्यंत थांबला. महाराष्ट्रातील पाच सरकारच्या काळात २२ वर्षे अनिल देशमुख यांनी मंत्रीपदे भुषवली आहेत.

AD Vs ED : नागपूर जिल्हापरिषदेतून राजकारणाला सुरूवात

अनिल देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषदेतून राजकारणाला सुरूवात केली. नव्वदच्या दशकात ते नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये काटोल मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढविली. काटोल विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडूण आले. आणि त्यानंतर ५ वर्षाचा कालावधी सोडला तर ते २२ वर्ष महाराष्ट्रात मंत्रीपदावर कायम आहेत.

१९९५ मध्ये भाजप सेना युती सरकारच्या काळात त्यांनी शिक्षण राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासनाचा मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. मात्र १९९९ मध्ये काँग्रेस मधून शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नवा पक्ष स्थापन झाला. तेव्हा अनिल देशमुख हे शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. आणि १९९९ ची विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून काटोल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.

सलग १५ वर्षे मंत्रीपदावर

त्यानंतर मात्र त्यांनी राजकारणात कधीच मागे वळून पाहिले नाही. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या १५ वर्षाच्या सत्तेत अनिल देशमुख हे मंत्रीपदावर कायम होते. अलिकडच्या काळात तर शरद पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांनी राजकारणात बाजी मारली. २०१४ च्या निवडणुकीत काटोल मतदारसंघात त्यांचेच पुतणे डॉ आशिष देशमुख यांनी त्यांचा पराभव केला.

२०१४ ते २०१९ एवढाच पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांचा राजकिय रिकामपणाचा होता. २०१९ ला झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा काटोल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. सरकार कोणाचंही असो अनिल देशमुख हे मंत्रीपदावर असणार हे समिकरण महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले.

Back to top button