पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी ४ मेरोजीचा अल्टीमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. घाटकोपरचे मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना घाटकोपर पोलिसांनी आज (दि.३) दुपारी अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त करण्यात आले आहेत.
घाटकोपरमधील चांदिवली येथील भानुशाली यांच्या कार्यालयाबाहेरील झाडावर बेकायदेशीरपणे भोंगे लावण्यात आले होते. याबाबत पोलिसांनी त्यांना भोंगे काढण्याबाबात सुचना दिल्या होत्या. परंतु भोंगे उतरविण्यात आले नाहीत. अखेर पोलिसांनी कारवाई करत भोंगे काढून जप्त केले आहेत. तसेच भानुशाली यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत शहर पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष राजीव जेवळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून कलम ११६, ११७, १५३ भादंवि १९७३ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये राज ठाकरे व राजीव जेवळीकर व इतर आयोजक यांचा समावेश असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी करीत आहेत.
हेही वाचलंत का ?