तेलुगू अभिनेत्याला टीव्ही अँकरने स्टूडिओतून बाहेर काढले; सोशल मीडियात अँकरची ‘धुलाई’! | पुढारी

तेलुगू अभिनेत्याला टीव्ही अँकरने स्टूडिओतून बाहेर काढले; सोशल मीडियात अँकरची 'धुलाई'!

पुढारी ऑनलाईन डेस्क : वृत्तवाहिन्यांमधील डिबेटमध्ये नेते आणि अँकर तसेच सत्ताधारी विरुद्ध विरोक्षी पक्षांचे बोलके प्रवक्ते यांचा खुलेआम नंगानाच नवीन राहिलेला नाही. एकमेकाला स्टुडिओमध्येच कानाखाली देण्यापर्यंतही प्रकार गेले आहेत. मात्र, एका तेलुगू वृत्तवाहिनीवर भलताच प्रकार घडल्याने सोशल मीडियात भलतीच चर्चा रंगली आहे.

लोकप्रिय तेलुगू अभिनेता विश्व सेन सोमवारी त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका वृत्तवाहिनीच्या न्यूजरुममध्ये पोहोचला होता. यावेळी अँकर आणि विश्व सेन यांच्यात वाद झाल्याने इंटरनेटवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये टीव्ही अँकर देवी नागवल्ली विश्वक सेनला हैदराबादमधील न्यूज स्टुडिओमधून बाहेर पडण्यास सांगत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, विश्व सेनचा अँकरने पागल सेन असा उल्लेख केला आणि इंटरनेटवर व्हायरल झालेल्या प्रँक व्हिडिओवरून एक हताश व्यक्ती असा उल्लेख केला. त्यामुळे विश्वक सेनचा पारा चांगलाच चढला.

भडकलेल्या विश्वकने अँकरला चांगलाच फैलावर घेत वैयक्तिकरित्या माझ्यावर हल्ला करण्याचा तुला कोणताही अधिकार नाही आणि तुझी जीभ ताळ्यात ठेव आणि मला वेडा किंवा निराश व्यक्ती म्हणू नको, असे सुनावले. तो पुढे म्हणाला की, त्याला कोणी निराश व्यक्ती म्हटलं आहे हे माहीत नाही.

यामुळे टीव्ही अँकर देवी नागवल्ली त्याच्यावर ओरडते आणि त्याला स्टुडिओतून बाहेर पडण्यास सांगते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच, विश्वक सेनच्या चाहत्यांनी अभिनेत्याला पाठिंबा दर्शवला आणि अँकरची सोशल मीडियात चांगलीच धुलाई केली. एका युझर्सने लिहिले की हे वर्तन अतिशय असभ्य होते आणि जर एखाद्या पाहुण्याने गैरवर्तन केले तर ती त्यांना काढून टाकू शकते परंतु कॅमेऱ्यासमोर असे अपमानास्पद वर्तन केले जाऊ नये.

आणखी एका युजरने लिहिले की, तो विश्व सेनला सपोर्ट करतो.

दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनच्या नावाखाली प्रँक व्हिडीओ बनवून उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी विश्वक सेनविरोधात राज्य मानवी हक्क आयोगाकडे पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचिकाकर्ते उच्च न्यायालयाचे वकील अरुण कुमार आहेत ज्यांनी अभिनेते आणि प्रँक व्हिडिओच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विश्वक सेनने त्याच्या आगामी रोमँटिक चित्रपट अशोका वनमलो अर्जुन कल्याणमच्या प्रमोशनसाठी एक प्रँक व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ आता व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वरून काढून टाकण्यात आला आहे.

Back to top button