Gautam Gambhir has the responsibility of coaching
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक Pudhari File Photo
बहार

गौतम गंभीर : नव्या पर्वाची सुरुवात

पुढारी वृत्तसेवा
निमिष पाटगावकर

गौतम गंभीरची प्रतिमा काहीसा आक्रमक, काहीसा भांडखोर अशी बनवली आहे. पण प्रत्यक्षात गंभीरचे गुण वेगळे आहेत. एक संघहित जपणारा, संघासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारा आणि मुख्य म्हणजे कोणाचीही तमा न बाळगता जे सत्य आहे आणि जे त्याला योग्य वाटते ते बोलणारा असा तो आहे. याच त्याच्या गुणांमुळे त्याचे प्रशिक्षक बनणे हे विधिलिखित होते.

भारताने ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला तेव्हा करोडो भारतीयांच्या एका डोळ्यात विश्वविजेते बनल्याचे आनंदाश्रू होते. त्याचबरोबर यापुढे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जडेजा पुन्हा दिसणार नाहीत, या विचाराने डोळ्याच्या कडा पाणावल्याही होत्या. या खेळाडूंची जागा नव्या दमाचे खेळाडू घेतीलच; पण याबरोबर अजून एक खांदेपालट झाला तो म्हणजे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची कारकीर्द समाप्त होऊन हा मुकुट गौतम गंभीर यांच्या डोक्यावर चढवला गेला. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा मुकुट हा काटेरी असतो. राहुल द्रविडच्या कारकिर्दीचा शेवट गोड झाला. पण 2021 ते 2024 दरम्यान अनेक महत्त्वाच्या स्पर्धांत अंतिम टप्प्यात हरल्यावर संघाच्या कर्णधाराबरोबरच द्रविडलाही टीकेचा धनी व्हायला लागले होते. रवी शास्त्रीकडून द्रविडने जेव्हा सूत्रे हाती घेतली तेव्हा दोघांच्या कार्यपद्धतीमुळे भारतीय क्रिकेटसाठी आगीच्या गोळ्याकडून लोण्याच्या गोळ्याकडे गेल्यासारखा संक्रमण काळ होता. आता गौतम गंभीरची प्रशिक्षकपदावर नेमणूक झाल्यामुळे पुन्हा हा आक्रमकतेच्या दिशेने प्रवास असेल. गौतम हे बुद्धाचे नाव असले तरी तो बुद्धासारखा शांत बसणार्‍यातला नाही आणि गंभीर असला तरी आक्रमक आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणजे साधारण खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर काही पावसाळे बघून तो प्रशिक्षक झाल्याचे आपण बघत आलो आहोत. पण गौतम गंभीर वयाच्या फक्त 42 व्या वर्षी प्रशिक्षक झाला आहे. स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त होऊन त्याला फक्त सहा वर्षे झाली आहेत. एक खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर राजकारणात काही काळ घालवून तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात वळला. अत्यंत सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या गंभीरला क्रिकेट काय किंवा राजकारण काय हे पैशामुळे आकर्षित करू शकत नाही तेव्हा त्याची पावले पुन्हा मैदानाकडे वळली ती निव्वळ क्रिकेटप्रेमामुळे. एक प्रशिक्षक म्हणून त्याला अनुभव आहे का? तर उत्तर नाही, असेच द्यावे लागेल. कारण तो अगदी प्रथम दर्जाच्या संघाचाही प्रशिक्षक कधी नव्हता. पण हा प्रशिक्षक निवडीचा मुख्य निकष नव्हताच. कारण असे असते तर रवी शास्त्री आणि अनिल कुंबळेही प्रशिक्षक झाले नसते. गौतम गंभीरने समुपदेशक म्हणून लखनौ जायंटस्ला आपल्या पहिल्या दोन मोसमात प्ले-ऑफपर्यंत पोहोचवले आणि गेल्या वर्षी तर कोलकाता नाईट रायडर्सला अजिंक्यपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. भारतीय काय, कुठल्याच आंतराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचे मुख्य काम असते ते संघाला जिंकण्यासाठी समुपदेशन करण्याचे. आंतरराष्ट्रीय पातळी गाठलेल्या कुठल्याही खेळाडूला प्रशिक्षकाची मदत ही त्याच्या तंत्रासाठी लागत नाही. कारण ते चांगले असल्यामुळेच तो इथपर्यंत पोहोचला असतो. त्याला गरज असते ती सामने जिंकायला लागणार्‍या समुपदेशनाची. गौतम गंभीर त्याच्या आयपीएलमधील समुपदेशकाच्या कामगिरीने नैसर्गिक पर्याय होता. व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला आपली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद सोडून प्रशिक्षक व्हायची इच्छा नव्हती तेव्हा गंभीरची निवड ही औपचारिकताच उरली होती.

एक प्रशिक्षक म्हणून त्याचा कार्यकाळ आगामी श्रीलंका मालिकेपासून चालू होईल. गंभीरचे ताबडतोब लक्ष्य असेल ते जागतिक कसोटी अजिंक्यपद मिळवायचे, जे दोनदा भारताकडून हुकले आहे. त्यापाठोपाठ 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे. या दोन स्पर्धांवर त्याची पुढची वाटचाल ठरणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी श्रीलंका मालिकेनंतर बांगला देश आणि न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेत गुण मिळवले तरी एक प्रशिक्षक म्हणून त्याचे मूल्यमापन पहिल्यांदा होईल ते या वर्षअखेरीस होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेने. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात पराभूत करून गेल्या दोन मालिका जिंकल्या आहेत तेव्हा गंभीरची पहिली परीक्षा भारताच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीवरून असेल. रोहित शर्मा, कोहली आणि जडेजा हे एक दिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असल्याने गंभीरला दुसरे महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे ट्वेंटी-ट्वेंटीचा संघ बांधण्याचे. हा विश्वचषक आपण जिंकल्याने अर्थातच पुढच्या 2026 च्या विश्वचषकासाठी भारतीयांच्या मोठ्या अपेक्षा असतील. या मोठ्या अपेक्षा पूर्ण करायला भारताकडे तेव्हा मोठे खेळाडू नसतील तेव्हा या दोन वर्षात कोहली, शर्मा, जडेजाची जागा भरून काढणारे खेळाडू गंभीरला घडवायचे आहेत. यासाठी त्याला टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार आणि अजित आगरकरच्या निवड समितीसोबत काम करून संघ बांधणी करावी लागेल.

संघाचा कर्णधार, प्रशिक्षक बदलला तरी पंधरापैकी बहुतांशी खेळाडू हे कायम असतात आणि ते एका संघबांधणीच्या प्रक्रियेला सरावलेले असतात. गौतम गंभीरला आपल्या योजना अमलात आणायच्या आधी सध्याच्या संघ प्रक्रियांचा अभ्यास करून त्यानुसार पुढची धोरणे ठरवावी लागतील. कुठलाही बदल हा स्वीकारार्ह होण्यास अवधी द्यावा लागतो. तितका संयम गंभीरला ठेवावा लागेल. गौतम गंभीरची धोरणे ही ट्वेंटी-ट्वेंटी संघासाठी पूर्ण भिन्न असतील आणि एकदिवसीय व कसोटी संघासाठी वेगळी असतील. याचे मुख्य कारण म्हणजे कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा, कोहली हे प्रमुख खेळाडू आणि गंभीर हे एकत्र खेळलेले आहेत. गंभीरचे 2016 सालचे कसोटी पुनरागमन हे कोहलीच्या नेतृत्वाखाली झाले होते. तेव्हा गंभीरची भूमिका ही प्रशिक्षकपदाची असली तरी इथे कुणी कोणाला क्रिकेटचे धडे द्यायचा संबंध उरत नाही. निव्वळ अनुभवीच नाही तर सर्वच खेळाडूंच्या बाबतीत गंभीरला खेळाडूंना त्यांचे सर्वोत्तम देण्यासाठी जे काही लागेल ते द्यायला एक आश्वासक पाठिंबा देणारी व्यक्ती म्हणून काम करायचे आहे.

गौतम गंभीरची प्रतिमा काहीसा आक्रमक, काहीसा भांडखोर अशी बनवली आहे. पण प्रत्यक्षात गंभीरचे गुण वेगळे आहेत. एक संघहित जपणारा, संघासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारा आणि मुख्य म्हणजे कोणाचीही तमा न बाळगता जे सत्य आहे आणि जे त्याला योग्य वाटते ते बोलणारा असा तो आहे. याच त्याच्या गुणांमुळे त्याचे प्रशिक्षक बनणे हे विधिलिखित होते. सर्वांशी गोडीगुलाबीने वागून अनेक धूर्त आपला फायदा साधून घेत असतात. पण त्याने त्यांच्या भूमिकेला न्याय द्यायला ते कमी पडतात. गंभीरला व्यक्तिगत कुठलाच फायदा उठवायचा नाही तेव्हा तो जे करेल ते संघहिताचेच असेल.

भारताकडे आज आयपीएलमुळे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटकरता प्रचंड प्रमाणात पर्याय आहेत. हे सर्व खेळाडू नव्या पिढीचे आहेत. गौतम गंभीरला त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेताना कदाचित स्वतःच्या तत्त्वांना मुरड घालून या पिढीला स्वातंत्र्य द्यावे लागेल. ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यावर राहुल द्रविडबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला होता की, द्रविडला काही गोष्टी त्याच्या विचारसरणीला अनुरूप वाटायच्या नाहीत. पण नव्या पिढीचे नवे धोरण जर संघाला फायदा करून देत असेल तर ते द्रविडने आपलेच म्हणणे न दामटता मान्य केले. गौतम गंभीरला नवा ट्वेंटी-ट्वेंटीचा संघ बांधायला हे करावे लागेल. जसं कोलकाता नाईट रायडर्सला मार्गदर्शन करताना त्याने चंद्रकांत पंडितच्या काही पारंपरिक पद्धतींची नव्याशी सांगड घालून संघाला फायदा करून दिला तसेच त्याला भारताच्या ट्वेंटी-ट्वेंटी संघाबाबत करावे लागेल. कोहली - शास्त्री या आक्रमक जोडीचे धोरण सहकार्‍यांवर उत्तम कामगिरीचे काहीसे दडपण आणून त्यांच्याकडून उत्तम कामगिरी करून घेण्याचे होते तर रोहित शर्मा - द्रविड यांचे धोरण खेळाडूला शक्य तितकी मोकळीक देऊन त्यांच्याकडून उत्तम कामगिरी करून घेण्याचे होते. या दोन पद्धतींचा सुवर्णमध्य गंभीरला काढावा लागेल.

अनेकजणांना प्रश्न पडला असेल, तो म्हणजे गंभीरच्या राज्यात कर्णधार नसलेला कोहली संघात नांदेल काय? त्यांच्या आयपीएल 2023 च्या वादावादीनंतर त्यांच्यातून विस्तव जात नसेल असेच वाटते. इथे एक लक्षात घेतले पाहिजे ते म्हणजे दोघेही दिल्लीचे असल्याने दोघेही नैसर्गिक आक्रमक आहेत. पण दोघेही भारताकडून अनेक वर्षे खेळल्याने दोघेही प्रगल्भ आहेत. दोघेही आपापल्या कर्तृत्वावर आले आहेत. 2011 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात तेंडुलकर, सेहवाग झटपट बाद झाल्यावर या दोघांनीच डाव सावरला होता. आता एक प्रशिक्षक आणि संघातील ज्येष्ठ खेळाडू म्हणून प्रगल्भतेने झाले गेले विसरून जाऊन दोघेही असाच भारताचा डाव सावरतील याची खात्री आहे. वैयक्तिक मतभेद व्यावसायिक खेळाडू कधीच खेळाच्या किंवा संघहिताच्या मुळावर येऊ देत नाहीत.

गौतम गंभीरकडे एक प्रशिक्षक म्हणून आव्हाने बरीच आहेत. पण त्याचबरोबर अपेक्षाही भरपूर आहेत. पोखरण अणुस्फोट चाचणी यशस्वी झाली तेव्हा ‘...आणि बुद्ध हसला’ या सांकेतिक शब्दांनी त्या घवघवीत यशाचे आपण वर्णन केले होते. या विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटचे नवे पर्व सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट प्रशिक्षकाची कारकीर्द ही एखाद्या अणुचाचणीइतकीच अवघड असते. आपल्या गंभीर कार्यप्रणालीने हा गौतमही भारतीय क्रिकेटला या नव्या पर्वात एका नव्या उंचीवर नेऊन भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चेहर्‍यावर यशाचे हास्य फुलवेल अशी आशा आहे.

SCROLL FOR NEXT