ENG vs WI Test : अँडरसनला विजयी निरोप, वेस्ट इंडिजचा धुव्वा

इंग्लंडचा डावाने विजय
ENG vs WI Test
अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटस् घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द संपवली.Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : ENG vs WI Test : पदार्पणवीर गस अ‍ॅटकिन्सन आणि दिग्गज जेम्स अँडरसन यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला. दुसर्‍या डावात 136 धावा करत वेस्ट इंडिजचा संघ ऑलआऊट झाला. या सामन्यासह इंग्लंडचा महान कसोटी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला संघाने विजयाने निरोप दिला. जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटस् घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द संपवली.

लॉर्डस् क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात 121 धावा करून वेस्ट इंडिजचा संघ सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने 371 धावा केल्या होत्या. यासह इंग्लंडने पहिल्या डावात 250 धावांची आघाडी मिळवली होती, पण वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा करत दुसर्‍या डावात 136 धावांवर संघ ऑलआऊट झाला.

लॉर्डस् क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडकडून पदार्पणवीर गस अ‍ॅटकिन्सच्या 7 विकेटस्च्या जोरावर वेस्ट इंडिजला केवळ 121 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात यजमान संघाने 371 धावा केल्या. इंग्लंडकडून फलंदाजी करताना झॅक क्राऊली (76), ऑली पोप (57), जो रूट (68), हॅरी ब्रूक (50) आणि जेमी स्मिथ (70) यांनी अर्धशतके झळकावली. अशाप्रकारे इंग्लंडने त्यांच्या डावात 250 धावांची आघाडी घेतली होती.

वेस्ट इंडिजच्या दुसर्‍या डावाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. संघाने ठराविक अंतराने झटपट विकेट गमावल्या. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 79 धावांत 6 विकेटस् गमावल्या होत्या. त्यामुळेच सामन्याच्या तिसर्‍या दिवशी इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव आटोपला आणि पहिला कसोटी सामना एक डाव आणि 136 धावांनी जिंकून इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news