पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) चे मुख्य प्रशिक्षक असणार नाही. रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्ससह आपला प्रवास संपवला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या एक्स हँडलवरून याची अधिकृतपणे पुष्टी करण्यात आली आहे. या प्रवासाबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने पाँटिंगचेही आभार मानले गेले आहेत.
पाँटिंगच्या उपस्थितीत आयपीएलमध्ये विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यात फ्रँचायझी अपयशी ठरली. त्यामुळे सात वर्षांनंतर त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा दोन वेळा विश्वचषक विजेता कर्णधार पाँटिंग 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला. पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली, दिल्ली संघ 2018 च्या हंगामात शेवटच्या स्थानावर राहिला, परंतु नंतर 2019, 2020 आणि 2021 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला. मात्र, दिल्ली कॅपिटल्स गेल्या तीन हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नाही. आयपीएल 2024 मध्ये पाँटिंगच्या कोचिंग आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर होती.
दिल्ली कॅपिटल्स नवीन मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करते की संघ संचालक सौरव गांगुलीला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगते हे पाहणे बाकी आहे. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे या पदावर कायम राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दिल्लीस्थित सह-मालक जेएसडब्ल्यू आणि जीएमआर ग्रुप या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला या प्रकरणातील भविष्यातील धोरणावर चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत.
रिकी पाँटिंगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम कर्णधार देखील मानले जाते. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार पाँटिंग आयपीएलमध्ये मुंबईकडून क्रिकेट खेळला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंग आयपीएलमध्ये मुंबईकडून क्रिकेट खेळला. यानंतर त्याने 2014 ते 2016 या काळात मुंबई संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले होते. याच काळात पाँटिंगने 2015 मध्ये संघाला चॅम्पियन बनवले होते.