आयकर विभागाचे ‘एआयएस कसा डाऊनलोड करायचा जाणून घ्या Pudhari File Photo
अर्थभान

आयकर : ‘एआयएस’ कसा डाऊनलोड करावा?

पुढारी वृत्तसेवा

अपर्णा देवकर

आयटीआर भरताना करदात्यांना आपल्या सर्व प्रकारांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. एखादी माहिती भरण्यास विसरत असाल, तर प्राप्तिकर खात्याकडून नोटीस मिळू शकते. या गोष्टी टाळण्यासाठी आयटीआर भरण्यापूर्वी एआयएसमध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला कर सल्लागार देत असतात.

जुलै महिना सुरू होत असताना अनेकांनी आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुरू केली असेल. पण, नसेल तर ती लवकरच सुरू करायला हवी. आयटीआर भरण्यासाठी वेळ लावू नये, असे कर सल्लागार सांगतात. आयटीआर दाखल करताना फॉर्म 26 एएस आणि अ‍ॅन्युअल इन्फॉरमेशन स्टेटमेंट (एआयएस) पाहणे गरजेचे आहे. यात टीडीएस आणि अन्य आर्थिक व्यवहाराचे विवरण दिसते. अ‍ॅन्युअल इन्फॉरमेशन स्टेटमेंट कसे तपासले जाते, हे पाहू.

एआयएस कसे डाऊनलोड करावे?

प्राप्तिकर खात्याच्या अधिकृत रिटर्न फायलिंग संकेतस्थळाच्या माध्यमातून एआयएस फॉर्म पाहू शकता. सुरुवातीला प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे लॉगईन केल्यानंतर होमपेज एआयएसवर क्लिक करावे लागेल. तेथे दोन टॅब इन्स्ट्रशन्स (सूचना) आणि एआयएस दिसेल. सूचना वाचल्यानंतर एआयएसला क्लिक करा. त्यानंतर ते डाऊनलोड करा. युजर आयडी आणि पासवर्डसाठी आपल्याला पॅन आणि जन्मतारखेचा वापर करावा लागेल.

एआयएसमध्ये काय दिसेल?

आयटीआर भरताना आर्थिक वर्षातील प्रत्येक प्रकारचे उत्पन्न दाखवावे लागते. नोकरीतून उत्पन्न, भाड्यातून उत्पन्न किंवा अन्य स्रोतातून मिळणारे उत्पन्न आदी. म्हणून वर्षभरातील प्रत्येक आर्थिक व्यवहार आणि टीडीएस जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. या आकलनातून आयटीआर भरताना आपल्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. एआयएस आणि फॉर्म 26 एएसमध्ये करदात्यांच्या व्यवहारांची संपूर्ण माहिती असते. कर विवरण भरताना तज्ज्ञांकडून दोन्हीची पडताळणी होते आणि त्यानुसार आयटीआर दाखल केले जाते.

प्राप्तिकर विभागाकडून मिळू शकते नोटीस

आयटीआर भरताना एखादी माहिती भरण्यास विसरलात, तर पुढे अडचण येऊ शकते. उदा - आपण शेअर खरेदी आणि म्युच्युअल फंडच्या विक्रीची माहिती दिली नाही, तर ‘नॉन डिसलोजर’साठी प्राप्तिकर खात्याकडून नोटीस मिळू शकते.

एआयएसमध्ये चुकीची माहिती असल्यास दुरुस्ती

कंपनीने दिलेला फॉर्म 16 आणि 26 एएस आणि एआयएसमधील डेटामध्ये तफावत असेल किंवा चुकीची माहिती असेल, तर तशी सूचना प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर द्यावी लागेल. एआयएसमध्ये तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. त्याचा वापर करण्यापूर्वी प्राप्तिकर खात्याच्या ई- फायलिंग पोर्टलवर लॉगईन करावे लागेल. तेथे नमूद कलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर तेथे एखादी चुकीची माहिती निदर्शनास आली असेल, तर आपण तसा फीडबॅक प्राप्तिकर विभागाला देऊ शकता.

‘फॉर्म-16’ आवश्यक

आपल्याला ‘एआयएस पार्ट बी’मध्ये एखादी चुकीची माहिती दिसत असेल तर तक्रार नोंदवू शकता. ‘पार्ट बी’मध्ये करदात्याचे उत्पन्न, टीडीएस. स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झेशन आदींचा उल्लेख असतो. तक्रार नोंदविण्यासाठी आपल्याला ‘बल्क फीडबॅक’ निवडावे लागेल. त्यानंतर चुकीच्या व्यवहाराला क्लिक करावे लागेल. नंतर ‘कंन्टिन्यू’ वर क्लिक करा. फीडबॅक ड्रॉपडाऊनच्या मेन्यूत तक्रारीचे कारण सांगावे लागेल. नंतर सबमिटवर क्लिक करावे लागेल. आपली तक्रार स्वीकारली गेली, तर एआयएसमध्ये डिडटरकडून नोंदविल्या गेलेल्या अहवालात त्या मूल्यांची पडताळणी केली जाईल आणि नंतर सुधारित मूल्य असलेली माहिती दिसेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT