अफगाणमधील क्रिकेट क्रांती!

राशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाण क्रिकेटची नवी क्रांती
new revolution in Afghan cricket under leadership of Rashid Khan
अफगाणिस्तान टीमPudhari File Photo
विवेक कुलकर्णी

जगभरातील टी-20 फ्रँचायझी लीगमधील खेळाडूंवर एक द़ृष्टिक्षेप टाकला, तर त्यातील अफगाण क्रिकेटपटूंचे योगदान लक्षात येते. राशीद खान, नबी व नूर अहमद यांच्या कामगिरीतील सातत्याचा परिपाक यंदा आयसीसी टी-20 विश्वचषकातही दिसून आला आणि अफगाणने अवघ्या क्रिकेट जगताला स्तिमित करून टाकणारी कामगिरी केली. युद्धजन्य परिस्थितीमुळे मायभूमीत तावूनसुलाखून निघालेल्या अफगाणी नागरिकांसाठी ही क्रिकेट क्रांती विशेष सुखावणारी ठरली आहे.

new revolution in Afghan cricket under leadership of Rashid Khan
मराठा आरक्षणाबाबत 10 दिवसांत मिळणार मोठी बातमी

रईसने सर्व यशाचे श्रेय दिले भारताला

‘आम्ही शेवटच्या चार संघांत पोहोचलो, हा काही ‘फ्ल्यूक’ नाही, हे आम्ही भविष्यात दाखवून देणारच आहोत; पण आम्ही हे सर्व यश स्वत:च्या हिमतीवर कमावले आहे, ही कोणीही दिलेली देणगी नाही, हे मी येथे ठणकावून सांगू इच्छितो!’ हे उद्गार आणखी कोणाचेही नव्हे, तर अफगाणचे सहायक प्रशिक्षक रईस अहमदझाई यांचे आहेत. रईस यांनी या सर्व यशाचे श्रेय दिले ते भारताला आणि ‘बीसीसीआय’चे ब्रेन चाईल्ड असलेल्या आयपीएल स्पर्धेला! ते म्हणाले, आम्ही या विश्वचषकासाठी खूप मेहनत घेतली, रात्रीचे दिवस केले, अनेक रणनीती तयार केली आणि जी परिपूर्ण रणनीती होती, ती प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावले! अफगाणच्या याच गेम प्लॅनमध्ये कधी बांगला देश, तर कधी ऑस्ट्रेलियासारखे देश अलगदपणे अडकत गेले आणि अफगाणचा हा वारू केव्हा उपांत्य फेरीत दाखल झाला, ते कळालेही नाही! अफगाण संघातील एक युवा खेळाडू त्यावेळी म्हणाला होता, ‘आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो, हे झोपेत पडलेले स्वप्न असेल तर आम्हाला झोपलेलेच राहूद्यात. त्या स्वप्नातून जागे करू नका!’

new revolution in Afghan cricket under leadership of Rashid Khan
Maharashtra Budget |अर्थसंकल्पातून भेट; महिलांनी मुख्यमंत्री शिंदेंना बांधल्या राख्या

राशीदने बांगला देशविरुद्ध विजयात सिंहाचा वाटा

आपण जगातील पहिल्या चार संघांमध्ये पोहोचलो आहोत, यावर अनेक अफगाणी चाहत्यांचाच नव्हे, तर अगदी संघातील खेळाडूंचा विश्वासही बसत नव्हता; पण तरीही क्रिकेटच्या मैदानातील क्रांतीचे मायभूमीतही कसे सुखद पडसाद उमटू शकतात, याची उत्तम अनुभूती अफगाणने यंदा अवघ्या क्रीडाविश्वाला दिली. एकीकडे, रोहित शर्माच्या 41 चेंडूंतील 92 धावांच्या विस्फोटक खेळीमुळे सेंट ल्युसियात भारताने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी चारीमुंड्या चित केले, त्याच्या दुसर्‍याच दिवशी राशीदने बांगला देशविरुद्ध नाट्यमय विजयात अगदी सिंहाचा वाटा उचलला आणि अफगाणने टी-20 इतिहासात नवा इतिहास रचला. कर्णधार कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे या अफगाण संघाचा कुशल नेता राशीद खान. त्याने संघ सहकार्‍यांना प्रेरणा दिली, हरसंभव प्रयत्न केले, करवून घेतले, शेवटच्या षटकापर्यंत, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहिला. कुठेही, काहीही कसर राहणार नाही, याची शक्य तितकी तजवीज केली, सहकार्‍यांकडून करवूनही घेतली!

पूर्ण स्पर्धेत राशीद नेहमीप्रमाणे शांत, संयमी, स्थितप्रज्ञ राहिला. अपवाद फक्त काही लढतींचा. यापैकी एका लढतीत बांगला देशविरुद्ध करीम जनतने धाव नाकारल्यानंतर धावचित होत परतावे लागल्यानंतर राशीदचा संताप अनावर झाला होता. (त्याआधी त्याने 10 चेंडूंत 3 षटकारांसह 19 धावा झोडपल्या आणि त्यातील एक षटकार 98 मीटरचा होता). राशीदने बॅट फेकून आपला राग व्यक्त केला; पण अपवाद वगळता राशीद खान पूर्ण स्पर्धेत संयमाचा मूर्तिमंत दाखला होता. आक्रमण व बचाव याचा संयुक्त मिलाफ होता!

तसे पाहता, यंदाच्या अफगाण संघात स्वत: राशीद वगळता जागतिक पातळीवर आव्हान उभे करू शकेल, असा आणखी एकही स्टार खेळाडू नव्हता; पण संघ अडचणीत असताना, संघासमोर बाका प्रसंग असताना प्रत्येकवेळी एक ना एक खेळाडू संघाच्या मदतीस धावून आला. कधी डावखुरा नूर अहमद, कधी सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज, तर कधी फजलहक फारुकी!

रईस अहमदझाई म्हणाला, या यशात आयपीएलचा वाटा

राशीदची तर बातच न्यारी. त्याचा गुगली दशकभरानंतर आजही भल्याभल्या फलंदाजांनाही कळालेला नाही. त्याचे फ्लिपर्स प्रतिस्पर्धी फलंदाजांचा भक्कम बचाव केव्हा भेदून जातात, हे त्या फलंदाजांनाही कळत नाही!

आता रईस अहमदझाई म्हणतात, त्याप्रमाणे या यशात आयपीएलचा वाटा सर्वाधिक कसा, तेही जाणून घेऊयात. मुळात छोट्या-छोट्या देशांतून जागतिकस्तरावर चुणूक दाखवणारे खेळाडू घडत असतात, त्यावेळी त्या यशात त्यांना मिळणार्‍या अनुभवाचा मोठा वाटा असतो. म्हणतात ना, अनुभव हा खूप मोठा गुरू असतो; पण त्यासाठी द्यावी लागणारी फी ही भरभक्कम असते. प्रत्येकाला ती झेपेलच, असे सांगता येत नाही! अफगाणी खेळाडूंबाबतही हेच झाले. या खेळाडूंना दिग्गज संघाविरुद्ध, दिग्गज-स्टार-सुपरस्टार खेळाडूंविरुद्ध खेळताना फोबिया होता, तो आयपीएलच्या अनुभवाने निघून गेला. बांगला देशचे गोलंदाज अगदी स्टार प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या दांड्या गूल करू लागले, फलंदाज सुपरस्टार बॉलर्सनाही मैदानाच्या चौफेर पिटाळू लागले. अफगाणी संघाला ही अनुभवसंपन्नता आयपीएलने दिली.

थोडेसे आकडेवारीत जायचे, तर बांगला देशविरुद्ध सुपर-8 फेरीतील सामन्यात खेळलेले अफगाणिस्तानचे 11 पैकी तब्बल 8 खेळाडू आयपीएलमध्ये खेळलेले होते! यात राशीद (गुजरात टायटन्स), मोहम्मद नबी (मुंबई इंडियन्स), रहमानउल्ला गुरबाज (केकेआर), फजलहक फारुकी (सनरायझर्स हैदराबाद), नवीन-अल-हक (लखनौ सुपर जायंटस्) आदींचा प्रामुख्याने समावेश राहिला.

अहमदझाई यांनी एका मुलाखतीत आणखी एका हृदयस्पर्शी मुद्द्याला जाता जाता स्पर्श केला होता. ते म्हणाले होते, ‘आम्ही अफगाणी पैसा किंवा आलिशान आयुष्य हेच सर्वस्व अजिबात मानत नाही. आयपीएल म्हणजे ईझी मनी, हे समीकरणच झाले आहे; पण परिस्थिती अशी अजिबात नाही. कारण, आयपीएल खेळण्यासाठीदेखील काही तरी अंगभूत कौशल्ये असावी लागतात आणि ती आहेत म्हणूनच आमचे खेळाडू आयपीएलमध्ये आहेत, हे लक्षात ठेवायला हवे.’

न्यूझीलंडला हरवल्यानंरत आमचा आत्मविश्वास वाढला

संघाचा कर्णधार राशीद खानने एका पत्रकार परिषदेत नमूद केले, साखळी फेरीत न्यूझीलंडला नमवले, तेथून आमचा आत्मविश्वास आणखी वृद्धिंगत झाला!

राशिदने त्यावेळी अहमदझाई यांच्याशी बोलताना सांगितले होते, ‘कोच, आमच्यासाठी विश्वचषक खर्‍या अर्थाने इथून सुरू होतोय!’

एरव्ही राशीद मैदानावर फारसा रिअ‍ॅक्ट होत नाही; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध नवीन-उल-हककडून क्षेत्ररक्षणात चूक झाल्यानंतर तो स्वत:ला रोखू शकला नाही. बांगला देशविरुद्ध जनतने दुसरी धाव नाकारल्यानंतर धावचित व्हावे लागल्यानंतर त्याने रागाने बॅट फेकली, धोंडशिरेची दुखापत झाल्याचा बनाव करणार्‍या गुलबदिनला कानपिचक्या दिल्या.

अहमदझाई म्हणतात, त्याप्रमाणे राशीदने अफगाण क्रिकेटमध्ये व्यावसायिकता आणली. अफगाणी चाहत्यांसाठी तो त्यांचा सचिन आहे. तो ज्या-ज्यावेळी मैदानात उतरतो, त्या-त्यावेळी त्यांच्या चाहत्यांना त्याने एकहाती विजय खेचून आणावा, असे वाटते! हा एकप्रकारे त्याच्यावरचा विश्वासच!

अफगाणचे इंग्लिश प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट एकदा दिलखुलासपणे म्हणाले होते, आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, यापुढेही नसेल!

अफगाणचे क्रिकेट कशा पद्धतीने आपल्या कक्षा रुंदावत चालले आहे, त्याची आणखी एक झलक म्हणजे त्यांनी टी-20 मध्ये प्रथमच पाकिस्तानसारख्या कसलेल्या संघाला चारीमुंड्या चित केले. मर्यादित षटकांच्या या क्रिकेट प्रकारात बांगला देशला पराभवाचे पाणी पाजले, विश्वचषकात इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका यांना नमवले. यंदा प्रथमच ऑस्ट्रेलियालाही धूळ चारली.

यंदाची टी-20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना तिकडे दूर कंदहारमध्ये रहमतुल्ला शेरजाद या स्थानिक समालोचकाने याचे अतिशय सुंदर वर्णन केले होते. तो म्हणाला होता, ‘मी अशीही मुले पाहिली आहेत, ज्यांची दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती; पण तरीही क्रिकेटमधील या यशाचा आनंद ती मुले अगदी रस्त्यावर येऊन साजरा करत होती. रस्त्यावरच नाचगाणी सुरू होती. माझ्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आले. कारण, याआधी आमच्या देशातील नागरिकांना असा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली होती, ते आठवतही नाही! काबूल असो, खोस्त, कंदहार, नगरहार किंवा पक्तिया, या सर्व छोट्या-मोठ्या शहरांतील, गावांतील रस्त्यांवर चाहत्यांचा ओसंडून वाहणारा आनंद खूप काही सांगून जातोय. भविष्यात काय लिहून ठेवले आहे, याची आम्हाला कोणालाच कल्पना नाही; पण या खेळाने आम्हाला खर्‍या अर्थाने एकजीव केलेय, हेच खरे!

ब्रेव्हो अफगाण!

कोण आहे मास्टरमाईंड?

यंदाच्या आयसीसी विश्वचषकातील अफगाणिस्तानची सनसनाटी वाटचाल ठळक चर्चेत राहिली. अफगाणने ज्या जिद्दीने, ज्या तडफेने खेळ साकारला, विजय खेचून आणण्याची धमक दाखवली, ते निव्वळ वाखाणण्याजोगे होते. अर्थात, या सार्‍या प्रवासामागे अफगाण संघाचा मास्टरमाईंड कोण असेल, तो म्हणजे विंडीजचा माजी अष्टपैलू डेव्हॉन ब्राव्हो! हा विश्वचषक सुरू होण्यापूर्वी अफगाण क्रिकेट संघाच्या गोलंदाजी सल्लागारपदी ब्राव्होची नियुक्ती केली गेली होती. विंडीजच्या 2 विश्वचषक विजयी संघातील सदस्य राहिलेल्या ब्राव्होच्या सल्ल्यामुळेच नवीन-उल-हकने मुस्तफिजूर रहमानला पायचित करत बांगला देशविरुद्ध रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब करून दिले होते!

विश्वचषकातील कामगिरी

वन-डे विश्वचषक

2007, 2011 : पात्रता मिळवण्यात अपयश

2019 : साखळी फेरीत गारद

2023 : साखळी फेरीत गारद

टी-20 विश्वचषक

2007, 2009 : पात्रता मिळवण्यात अपयश

2010 : साखळी फेरीत गारद

2012 : साखळी फेरीत गारद

2014 : पहिल्या फेरीतून बाहेर

2016 : सुपर-10 मधून बाहेर

2021 : सुपर-12 मधून बाहेर

2024 : उपांत्य फेरी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news