धुळे पुढारी वृत्तसेवा
धुळे महानगरपालिका पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या आरती अरुण पवार विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या अनिता संजय देवरे यांचा 2 हजार 94 मतांनी पराभव केला. धुळे महानगरपालिका पोटनिवडणुकीतील विजयामुळे भाजपचे संख्याबळ ५१ झालं आहे.
धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच बच्या जागेवर गेल्यावेळी लोकसंग्राम पक्षाच्या सौ हेमाताई अनिल गोटे या विजयी झाल्या होत्या. मात्र त्यांनी राजीनामा दिला. ही जागा रिक्त होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. यात चौरंगी लढत झाली. मंगळवारी ( दि. २१) झालेल्या मतदानाकडे मतदारांनी सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून आले. या एका जागेसाठी केवळ 30. 96 टक्के मतदान झाले.
आज धुळे महानगरपालिकेच्या सभागृहांमध्ये मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी अंती भारतीय जनता पार्टीच्या आरती अरुण पवार यांना 4408 मते मिळाली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या अनिता संजय देवरे यांचा २ हजार ९४ मतांनी दणदणीत पराभव केला. देवरे यांना 1614 मते मिळाली .तर अपक्ष उमेदवार विद्या संजय नांद्रे यांना 315 आणि संध्या सतीश पाटील यांना 140 मते मिळाली.
मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच आरती पवार यांनी आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत तब्बल 132 मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच आणि धुळे शहरातील रस्त्यांचा दुरवस्थेचा प्रश्न शिवसेनेने प्रचारात कळीचा मुद्दा केला होता. मतदान केंद्राच्या बाहेर उभ्या असणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना आवाहन करत असतानाच धुळ्याचे खड्डे पूर्ण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला मतदान न करण्याचे आवाहन केले. मात्र मतमोजणीचा कल पाहता मतदारांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मतमोजणीचा निकाल लागल्या बरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महानपालिकेच्या प्रवेशद्वारावर फटाक्यांची आतषबाजी केली.
हेही वाचलं का?