पुणे; दिनेश गुप्ता : मानवी पुरुषार्थ (शुक्राणू निर्मितीचे प्रमाण आणि शुक्राणू सक्रियता या अर्थाने) तुम्ही किती घट्ट किंवा सैल अंतर्वस्त्र घालता यावर अवलंबून असतो. जे पुरुष सैल अंतर्वस्त्र घालतात (अर्थात बर्मुडा वगैरे) त्यांच्या शुक्राणूंची संख्या घट्ट अंतवस्त्रे घालणार्या पुरुषापेक्षा 17 टक्के जास्त असते.
शिवाय त्यांचे शुक्राणू 33 टक्के अधिक सक्रिय असल्याचे एका संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे घट्ट कपडे आणि सैल अंतर्वस्त्र यांचा शुक्राणू निर्मिती संख्या आणि त्याच्या सक्रियतेवर थेट परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. फर्टिलिटीवर आधारित एका आंतरराष्ट्रीय संशोधनात ही बाब सिद्ध झाली आहे.
मूल हवे असूनदेखील लग्नानंतर अनेक प्रयत्नानंतरही संतती सुखापासून बहुतांश जोडपी वंचित राहतात. तेव्हा त्या जोडप्याला वंध्यत्व आहे, असे मानले जाते. माझ्यात कोणताही दोष असणे अशक्य आहे, अशी पुरुषी मानसिकता अडचणीची ठरते. अशावेळी ही चौकट मोडून उपचार घ्यायची तयारी दाखवणे आणि ती अंगिकारणे ही वंध्यत्व उपचारासाठीची पहिली व सर्वात महत्त्वाची पायरी आहे. अशाच प्रकारच्या चाचणीतून पुरुषातील वीर्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना आधी अंदाजे साडेतीन ते चार लाख कृत्रिम गर्भधारणा केसेस याभारतात होत होत्या. पण कोरोना नंतर त्यात 70 ते 80 टक्के घट झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
कामाचा ताण, लॅपटॉप / मोबाइल यांसारख्या गॅजेट्सचा जननेंद्रियाच्या नजीकचा सतत वापर, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा व भेसळयुक्त तसेच जंक पदार्थांचे सेवन. दारू, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन या सवयींमुळे आधीच नाजूक असलेली अवस्था पुरुषांमधील शुक्राणू कमी करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. तसेच तरुण वयात सर्रास आढळणारा मधुमेह आणि उच्च रक्तदाब व त्यावरील औषधांचे दुष्परिणाम यामुळे शुक्राणुंचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसते.
तीन द्रव्याचा संयोग वीर्यात
अंडकोष, प्रोस्टेट व सेमिनल व्हेसिकल या तीन ग्रंथींमधील द्रव्यांचा संयोग वीर्यात असतो. यातील एखाद्या किंवा तिन्ही ग्रंथीमध्ये संसर्ग किंवा आजार असू शकतो. सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसीजेस (एसटीडी), ट्यूबरक्युलॉसिस (टीबी), कलायमेडिया हा संसर्ग पुरुष वंध्यत्वासाठी आढळून आलेला आहे.
व्हेरिकोसिल : वृषणाभोवतालच्या रक्तवाहिन्यांचा आकार वाढून वृषणांचे तापमान वाढल्यामुळे शुक्राणूंच्या वाढीस निर्माण झालेला अडथळा.
पुरुष वंध्यत्वाच्या चाचण्या
अत्यानुधिक तपासणीद्वारे जंतूसंसर्ग, व्हेरिकोसिल, हायड्रोसिल, इत्यादींची चाचणी होऊ शकते. गरजेनुसार, वीर्यातील सक्रिय शुक्राणूंची संख्या व गतीच्या वाढीसाठी काही संप्रेरके व प्रतिजैविके दिली जाऊ शकतात. व्हेरिकोसिल, हायड्रोसिल, बंद शुक्रनलिका यांवर शस्त्रक्रियेद्वारा यशस्वी उपचार करता येतात.
घट्ट वस्त्रांनी शुक्राणूंचे प्रमाण कमी
एका संशोधनानुसार सैल चड्ड्या घालून वावरणार्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या घट्ट अंतर्वस्त्र घालणार्या पुरुषांपेक्षा 25 टक्के जास्त आढळली आहे. सैल कपडे घातले की टेस्टिकल्स किंवा अंडकोशाभोवती हवा खेळती आणि थंड राहते. त्यामुळे फक्त आपण काय घालतो, यावरून बरंच काही बदलू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
शुक्राणू निर्मितीसाठी 34 तापमान संवेदनशील
शुक्राणूंच्या निर्मितीसाठी 34 अंश सेल्सियसच्या आसपासचे तापमान संवेदनशील मानले जाते. पुरुष जीन्स किंवा ट्राउझर पँटच्या आत घट्ट अंडरवेअर घालतात. यामुळे टेस्टिकल्स शरीराच्या अगदी जवळ धरले जातात आणि त्यांचे तापमान वाढते.
महिने लागतात नव्या शुक्राणू निर्मितीसाठी
वैद्यकीय अभ्यासानुसार सगळे शुक्राणू पूर्णतः नव्याने तयार व्हायला किमान तीन महिने लागतात. त्यामुळे तुम्ही थोडे आधीच या बदलासाठी तसे प्लॅनिंग करायला हवे.
वीर्य बँक काय करते…..
निपुत्रिक जोडप्यांना वरदान ठरलेल्या टेस्ट ट्यूब बेबी, सरोगसी उपचार पद्धतीत वीर्य बँक महत्वाचे काम करते. वीर्यदान करणार्यांची संपूर्ण माहिती व जन्माला येणार्या बाळास भविष्यात अडचण येणार नाही याची काळजी घेते. डोनर बाबतीत गुप्तता आणि त्याचा डाटा गुप्त ठेऊन भविष्यात अडचण येणार नाही याची खबरदारीही बँक घेते. वीर्य दान दिल्यानंतर त्या विर्यातून चांगले शुक्राणू वेगळे करून बँकेत ठेवले जाते. डॉक्टरकडून शुक्राणूंची मागणी आली किंव्हा बँकेत फलित करून गर्भाशयात सोडायचे असल्यास ते काम ही अत्यंत काळजीपूर्वक केली जातात. वीर्य बँक डोनर बाबतीत सर्व गोपनीयता पाळत निपुत्रिकांसाठी काम करतात.
जन्मदर घटला
अनेक जोडप्यांना मुले न होण्याची वेगवेगळी कारणे असतात. कोरोनापूर्वी अपत्य प्राप्तीसाठी येणार्या जोडप्यांपैकी येणार्यांची संख्या घटली आहे. शिवाय चाचणीनंतर दोष असल्याचे आढळतात. उपचार करून बाळ कसे राहील, याच्यावर लक्ष दिले जाते. – डॉ. मंजू जिल्ला, प्रसूतीतज्ज्ञ
यावर अभ्यास सुरू
मागील काही वर्षांतील पाहणीनुसार पुरुषांतील शुक्राणूंचे प्रमाण घटत असल्याचे दिसत आहे आहे. ही चिंतेची बाब असून जागतिक स्तरावर यावर अभ्यास केला जातो. आमच्याकडे येणार्या रुग्णांची देखील हीच स्थिती आहे. – डॉ. विजय दहिफळे, वंध्यत्व तज्ज्ञ.