पाटणा;पुढारी ऑनलाईन: गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सर्वांनाच वेठीस धरलेल्या कोरोनाचा फैलाव आता ओसरु लागला आहे. देशातील बहुतांश राज्यामध्ये रुग्णसंख्येमध्ये घट होत आहे. अशातच बिहार , आंध्र प्रदेश या राज्यांमधील परिस्थिती खूपच सकारात्मक आहे. मागील २४ तासांमध्ये दोन्ही राज्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे आता बिहार , आंध्र प्रदेश राज्यांची वाटचाल कोरोनामुक्त राज्यांकडे होत असल्याचे मानले जात आहे.
बिहारमधील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यात १ लाख ४४ हजार १८५ जणांची चाचणी करण्यात आली. बिहार राज्यातील सर्वांचे अहवाल हा कोरोना निगेटीव्हचा आला आहे, अशी माहिती बिहार राज्य आरोग्य समितीचे कार्यवाहक संजय कुमार सिंह यांनी दिली. मात्र यामध्ये एका व्यक्ती बाधित असून तो आसाममधील आहे. तो नुकताच बिहारला आला होता, असेही त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग कमी झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र अद्याप कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. सद्यस्थिती कायम ठेवायची असेल तर बिहारमध्ये सर्वांनीच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोमवारी राज्यात केवळ तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते. यामध्ये बेगूसराय, भोजप आणि दरंभगा जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश होता.
ऑगस्ट महिन्यात बिहारमधील बक्सर, कैमूर, जहानाबाद आणि बांका हे जिल्हे कोरोनामुक्त झाले होते.
मात्र काही दिवसांनंतर पुन्हा एकदा या चार जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळले.
त्यामुळे बिहारची वाटचाल कोरोनामुक्त राज्याकडे सुरु असली तरी अद्याप धोका कायम आहे.
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती कायम आहे, असे बिहार राज्य आरोग्य समितीचे कार्यवाहक संजय कुमार सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचलं का?