प्रयोगशाळेत तयार केली कृत्रिम कॉफी | पुढारी

प्रयोगशाळेत तयार केली कृत्रिम कॉफी

लंडन : जगभरातील कॉफीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत कृत्रिम कॉफी विकसित केली आहे. स्वाद आणि सुगंध या बाबतीत ती नैसर्गिक कॉफीसारखीच असल्याचा त्यांचा दावा आहे. फिनलँडच्या व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटरने ही कॉफी विकसित केली आहे. कॉफीचा सर्वाधिक वापर होणार्‍या देशांमध्ये फिनलँडचाही समावेश होतो.

प्रयोगशाळेत कॉफी तयार करण्यासाठी संशोधकांनी यासाठीचे सर्वात प्रसिद्ध रोप ‘अरेबिका’चीच निवड केली. अरेबिकाच्या पेशींचे नमुने घेण्यात आले. त्यापासून प्रयोगशाळेत ‘जेनेटिकली इंजिनिअर्ड’ कॉफी तयार करण्यात आली. पेशींपासून जनुकीय तंत्राने अशी कॉफी करण्याच्या पद्धतीला ‘सेल्युलर अ‍ॅग्रीकल्चर’ म्हटले जाते.

सोप्या भाषेत सांगायचे तर वनस्पतींच्या पेशींना वेगळे काढून त्यापासून ही कॉफी बनवण्यात आली. याच पद्धतीने प्रयोगशाळेत कृत्रिम मांस आणि दूधही तयार करण्यात आले होते. संशोधकांनी म्हटले आहे की जगभरात कॉफीचे 56 टक्के उत्पादन अरेबिका वनस्पतीपासूनच होते.

त्यामुळे प्रयोगशाळेत कॉफी विकसित करण्यासाठी याच रोपाचा वापर करण्यात आला. संशोधिका डॉ. हीको रिशर यांनी सांगितले की आमच्या टीमने या कॉफीचा स्वाद आणि सुगंध यांची चाचणी घेतली. हे गुण अगदी नेहमीच्या कॉफीसारखेच असल्याचे दिसून आले. या कॉफीचे सेवन करणे हा आनंददायी अनुभव होता!

Back to top button