नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक उपक्रम विकण्याचे सरकारचे धोरण आहे. हे देश विकण्याचे धोरण असल्याने त्याविरोधात संघटना आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत सार्वजनिक उपक्रमांना ताकद दिली जात नाही, तोपर्यंत रोजगार वाढणार नाहीत, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सोमवारी व्यक्त केले. गेल्या ५० ते ६० वर्षात सर्वाधिक रोजगार सार्वजनिक उपक्रमांनी दिला आहे. सरकारी उद्योग संपवून दोन पाच खासगी उद्योगांना आपल्या मर्जीतल्या लोकांच्या ताब्यात देश द्यायचा. याने त्यांची संपत्ती वाढेल. पर्यायाने भाजपची संपत्ती वाढेल, हे धोकादायक असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात खोटेपणाचा कळस उभारला जातोय. विरोधी पक्षाकडून यथेच्छ बदनामी मोहीम राबवली जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात जे राबवले जात आहे, या लफंगेगिरीला हिंदूत्त्वात स्थान नाही. विरोधीपक्षाने रेटून खोटे बोलण्यापेक्षा सहज आणि सत्य बोलावे. महाराष्ट्राची तीच परंपरा आहे, असे राऊत (sanjay raut) म्हणाले.
महाराष्ट्र सरकारचे नाणार संदर्भात मतपरिवर्तन होईल, असे म्हटलेय. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी शिक्षणावर बोलायला हवे. त्यांच्या काळात त्यांनी मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही, असे ते म्हणाले. भारतात उत्तर पूर्व भागात हिंदू अल्पसंख्याक आहेत. सीमाभागात मराठी भाषिक अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यांच्यावर अन्याय होणाऱ्याबद्दल कोणाला काही वाटत नाही, असे राऊत म्हणाले.
प्रमोद सावंत यांना शुभेच्छा देताना राऊत म्हणाले की, गोव्याच्या जनतेने भाजपला बहुमताइतका कौल दिला आहे. प्रमोद सावंत यांनी पाच लाख रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली होती. ती पूर्ण करावी. आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्गमध्ये जात आहेत, ही चांगली बाब आहे. गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांची प्रकरणं आवर घालण्यापलीकडे गेलेली आहेत. दोन्ही माणसांबद्दल महाराष्ट्रातील जनता निर्णय घेईल. शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या होणाऱ्या लोकार्पणाला राजकीय विरोध चुकीचा आहे. वैफल्यग्रस्त माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात.
डायरी प्रकरण ऐकून गंमत वाटली. बिर्ला सारडा डायरी प्रकरण होते. त्यामध्ये देशात सत्तेत असणाऱ्या भाजपला सध्या २५ कोटी, ३० कोटी रुपये देण्यात आले होते. सीबीआयने डायरी हा विश्वासार्ह पुरावा नाही, असे सांगितले होते. भाजपचे नाव आल्यानंतर तसे सांगण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून धमकावण्याचे काम सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल धमक्या दिल्या आहेत. खोट्या डायऱ्याही तयार केल्या जाऊ शकतात. मला भाजपच्या कार्यपद्धतीवर संशय आहे, असे देखील ते म्हणाले.
हेही वाचलंत का ?