GT vs LSG : गुजरात-लखनौ यांच्यात आज IPL पदार्पणाचा सामना, पंड्या ब्रदर्स मैदानात भिडणार | पुढारी

GT vs LSG : गुजरात-लखनौ यांच्यात आज IPL पदार्पणाचा सामना, पंड्या ब्रदर्स मैदानात भिडणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ च्या चौथ्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स आणि के. एल. राहुलच्या लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही संघासाठी हा पदार्पणाचा सामना आहे. हा सामना आज (२८-०३-२०२२) रोजी संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. (GT vs LSG)

आज दोन नवीन संघ आयपीएल २०२२ मध्ये पदार्पण करत आहेत. या हंगामात, लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा हा सामना आहे. गुजरात संघाच्या कर्णधार पदाची धुरा भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्याकडे देण्यात आली आहे. तर लखनौची कमान भारतीय सलामीवीर के. एल. राहुलच्या हाती आहे. हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही. राहुलही दुखापतीमुळे त्याला काही मालिकांमधून विश्रांती देण्यात आली होती.

गुजरातकडून डावाची सुरूवात फलंदाज शुभमन गिल आणि रहमानउल्ला गुरबाज करू शकतात. हे दोन्ही फलंदाज आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखले जातात. वानखेडेच्या खेळपट्टीत वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला उसळी मिळते. अशा स्थितीत सलामीवीरांना सावधानतेने फलंदाजी करावी लागणार आहे.(GT vs LSG)

मुंबई इंडियन्सकडे असताना हार्दिकने वानखेडे स्टेडियमवर अनेक सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याला वानखेडेची चांगलीच ओळख आहे. गुजरातच्या मधल्या फळीत हार्दिक, विजय शंकर, राहुल तेवातिया आणि डेव्हिड मिलरसारखे अनुभवी खेळाडू आहेत.

लखनौचे तीन अष्टपैलू खेळाडू उपलब्ध नाहीत

लखनौची फलंदाजी कर्णधार केएल राहुल आणि मनीष पांडे यांच्यावर अवलंबून आहे. संघात अनेक अष्टपैलू खेळाडूही आहेत. या संघात क्रुणाल पांड्या, दीपक हुडा, कृष्णप्पा गौतम यांच्याशिवाय मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर आणि काइल मेयर्स आहेत. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यामुळे होल्डर आणि मेयर्स सध्या अनुपलब्ध आहेत. स्टोइनिसही पाकिस्तानात आहे. लखनौच्या गोलंदाजीत अनुभवाची कमतरता आहे. आवेश खान हा त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. तर फिरकीची गोलंदाजीची जबाबदारी युवा गोलंदाज रवी बिश्नोईच्या खांद्यावर असेल.

एकमेकाला भिडणार पांड्या ब्रदर्स

या सामन्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे बंधू विरूध्द संघातून खेळणार आहेत. दोन्ही बंधू गेल्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होते. देशांतर्गत क्रिकेटमध्येही ते एकाच संघाकडून खेळतात. आता पहिल्यांदाच हे बंधू आमने सामने येणार आहेत.

दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स : रहमानउल्ला गुरबाज, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, वरुण आरोन.

लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, एविन लुईस, मनीष पांडे, क्रुणाल पांड्या, दीपक हुडा, कृष्णप्पा गौतम, आवेश खान, रवी बिश्नोई, अँड्र्यू टाय, दुष्मंथा चमिरा.

Back to top button