बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: आषाढ महिन्याच्या आगमनाबरोबरच वारकर्यांना वेध लागतात ते विठू दर्शनाचे. हाती टाळ, गोपीचंदनाने मढलेले भाळ, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने घुमणारा रामकृष्ण हरीचा गजर…. टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर ज्ञानोबा, तुकोबाचे गाण्यात येणारे अभंग, अशा भक्तिमय वातावरणात सीमाभागातील गावागावांतून पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत. दिंडीमध्ये सहभागी होणार्या भाविक आणि वारकर्यांमुळे ठिकठिकाणी पंढरपूर अवतरल्याचा भास होत आहे.
तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. गावागावांमध्ये विठ्ठलाची मंदिरे बांधण्यात असून आषाढी वारीला जाणार्यांची संख्याही मोठी आहे. तालुक्यातील अनेक वारकरी मंडळे पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला जातात. सासवड आणि देहूमधून निघणार्या मुख्य दिंडीमध्ये अनेकजण सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर गावागावांतून पायी दिंडी निघण्याची परंपरा सीमाभागात सुरू झाली. यामध्ये वारकरी, महिला, भाविक, युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
यंदा तालुक्यातील आंबेवाडी, सुळगा (हिं.), उचगाव, केदनूर, कंग्राळी (खु.), धामणे, सांबरा, निलजी येथून पायी दिंड्या निघाल्या आहेत. त्याचबरोबर वारीसाठी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जाणार्या भाविकांची संख्याही मोठी आहे. पायी दिंडीमध्ये सहभागी होणार्या भाविकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. लोकवर्गणीतून खर्च करण्यात येतो. अनेकजण देणग्या देतात. यातून पंढरपूर आणि देवदर्शनाचा अनेक गरीब भाविकांना लाभ होतो.
उचगाव दिंडी पंढरपूरकडे
उचगाव : पुढारी वतसेवा :
श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळातर्फे आषाढी एकादशीसाठी पायी दिंडी पंढरपूरला रवाना झाली. गावातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल मंदिरामध्ये
पायी दिंडीतून जाणार्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले. दिंडीमध्ये उचगाव, मण्णूर, आंबेवाडी, गोजगा, सुळगा, कल्लेहोळ येथील वारकरी सहभागी झाले आहेत. उचगाव येथून गोजगा, आंबेवाडी, मण्णूरमार्गे कडोलीहून पंढरपूरला रवाना झाली. प्रत्येक गावातून दिंडीचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी नाष्टा देण्यात आला. 10 जुलै रोजी होणार्या आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी आठ दिवस अगोदर जात आहे.
दिंडीमध्ये भगव्या ध्वजासह टाळ-मृदंगाचा गजर सुरू आहे. पावसाने ओढ दिल्याने प्रवास सुखकर होत आहे. दिंडीमध्ये उदय तरळे, राजू मण्णूरकर, दत्ता लोहार, उमाजी तरले, हणमत नवार, तुकाराम पावशे, मधु नाईक, मधु पावले, देवाप्पा डोणकरी, लक्ष्मण चौगुले, दत्ता चौगुले, मारुती तुपारे, कलव्वा तोरे, बेबी तोरे आदी वारकरी सहभागी झाले आहेत.
हेही वाचलंत का?
वारीमुळे मानसिक समाधान मिळते. समाजाला समानतेचा संदेश दिला जातो. वारीत सात्विक संस्कार होतात. युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात येतो.
– राजू कोचेरी, वारकरीअनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी करतो. चार वर्षांपासून आंबेवाडीतून पायी दिंडी सुरू केली आहे. दिंडीमध्ये युवक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
– सिद्राय तरळे, वारकरीमागील 14 वर्षांपासून केदनूर ते पंढरपूर पायी दिंडी नेण्यात येते. दिवसेंदिवस दिंडीला प्रतिसाद वाढत आहे. दिंडीतून मानसिक समाधान मिळते. यामुळे युवकांचाही सहभाग वाढत आहे. अनेक वर्षांपासून वारीची परंपरा सुरू आहे.
– मारुती संभाजी, वारकरीपंढरपूरची वारी ही सांस्कृतिक आणि धार्मिक संस्कार करणारी आहे. वारीतून अनेक संस्कार होतात. व्यसनापासून लांब राहण्याची प्रेरणा मिळते. यामुळे वारीमध्ये सहभागी होत असतो.
– बाबाजी पावशे, वारकरीआषाढ येताच पंढरपूरला जाण्याची ओढ लागते. अनेक अडचणी आल्यातरी वारीमध्ये कधीही खंड पडला नाही. नामस्मरण, भजन, कीर्तन यामुळे पायी चालण्याचे कधीही श्रम वाटत नाहीत.
– सोनाबाई पावले, वारकरी