दीपेश सुराणा :
पिंपरी : संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचार घेण्यासाठी येणार्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथे विविध प्रमुख शस्त्रक्रियांसाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने रुग्णांना त्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालय गाठावे लागत आहे. तसेच, ज्या शस्त्रक्रियांची सोय आहे, त्यासाठीदेखील दोन-दोन महिने थांबावे लागत आहे. वेळप्रसंगी या शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करून घ्याव्या लागत आहेत.
वायसीएम रुग्णालयात 750 रुग्ण दाखल करुन घेण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात येथे सध्या 650 ते 675 रुग्ण दाखल करुन घेता येत आहे. शस्त्रक्रिया कक्ष, डायलेसीस, तातडीचे उपचार व अन्य कारणांसाठी जवळपास 80 खाटा राखीव ठेवाव्या लागत आहे. त्यामुळे पुर्ण क्षमतेने रुग्ण घेता येत नसल्याचे सध्याचे वास्तव आहे. सध्या एका वॉर्डाचे नुतनीकरण सुरु आहे. तर, एक वॉर्डमध्ये बंद केलेल्या जम्बो कोवीड आणि अॅटो क्लस्टर रुग्णालयातील साहित्य ठेवले आहे. त्यामुळे दोन वॉर्ड वापरता येत नाही.
कोणत्या शस्त्रक्रियांमध्ये अडथळे
दुर्बिणीच्या साहाय्याने ओटीपोटात केली जाणारी शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपिक सर्जरी), हाडाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (ऑर्थोपेडिक इम्प्लांट सर्जरी) या शस्त्रक्रिया सध्या वायसीएम रुग्णालयात करण्यात येत नाही. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, गुडघा, खुबा, हात आणि पायातील हाडांच्या शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, मेंदूत आणि पाठीच्या कण्यावर केल्या जाणार्या शस्त्रक्रिया यांच्यासाठी सध्या 15 दिवस ते 3 महिने 'वेटींग' आहे.
शस्त्रक्रियांना विलंब होण्याची कारणे काय?
तज्ञ डॉक्टरांची कमतरता
शस्त्रक्रिया कक्षांची अपुरी संख्या
वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील मनुष्यबळाचा अभाव
गेल्या काही दिवसांपासून मुलीला प्रसुतीपूर्व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. उपचार संथ गतीने केले जात आहे. तसेच, मुख्य डॉक्टर एकदा तपासण्यासाठी येऊन गेले की परत येत नाहीत. रुग्णालयात केले जाणारे उपचार तातडीने होणे गरजेचे आहे.
– कैलास परदेशी,
रुग्णाचे नातेवाईकरुग्णालयात आवश्यक विविध प्रकारची यंत्रसामग्री आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी भांडार विभागाकडे मागणी केलेली आहे. विविध शस्त्रक्रियांसाठी आवश्यक असणार्या काही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. 2 शस्त्रक्रिया कक्षांचे रूपांतर मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्षात केले जात आहे. त्यामुळेही शस्त्रक्रियांना विलंब होत आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे,
अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.
कोणत्या शस्त्रक्रियेला किती 'वेटिंग'
मोतीबिंदू शस्त्रक्रिया
1 महिने (210 शस्त्रक्रिया)
गुडघा, खुबा, हात आणि पायातील हाडाच्या शस्त्रक्रिया
1 महिने (40 शस्त्रक्रिया)
सामान्य शस्त्रक्रिया
15 दिवस (70 शस्त्रक्रिया)
मेंदू आणि पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रिया
2 ते 3 महिने
(150 शस्त्रक्रिया)