पुणे : 'दिवाळी अंकांनी अनेक लेखकांना घडविले, वाचकांची अभिरुची समृद्ध केली. दिवाळी अंक मराठी माणसाचा मानबिंदू आहे,' असे मत 95व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचे (2021) पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. संगीता बर्वे, मनोहर सोनवणे आणि मंजिरी बोंद्रे यांनी काम पाहिले. प्रा. जोशी म्हणाले, 'दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेच ते लेखक वर्षानुवर्षे लिहीत असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. दिवाळी अंकांना जाहिरातीच्या रूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनिकांना पूर्वी आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटत होते. आज ती भावना राहिली नाही. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.