विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी #अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले आहेत का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांचे कुठे हनिमून चाललेय माहिती नाही. एक पोलीस आयुक्त असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको. ते जर कोणाला दिसले तर जरूर सांगा, अशा शब्दात त्यांनी टीका
केली.
ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईचेही अमृता फडणवीस यांनी समर्थन केले. येथे लोक ड्रग्ज घेऊन फिरत असतील तर महाराष्ट्रासाठी योग्य नाही.
तरूणांना लगेच तुरुंगात टाकावे हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते ड्रग कुठून येते, त्याचे नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे असेही #अमृता फडणवीस यांनी सांगितले.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शंभर कोटी रुपयांच्या खंडणी घोटाळ्यात लुकआऊट नोटीस बजावल्याचे कळते. मात्र, मुंबईतील ईडीच्या अधिकार्यांनी या नोटिसीला दुजोरा दिलेला नाही. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर ईडीने या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला. आतापर्यंत ईडीने देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे. मात्र, या चौकशीला उपस्थित राहणे त्यांनी टाळले आहे. या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तेेथेही त्यांना दिलासा मिळू शकला नाही.
परमबीर सिंग हे देशाबाहेर गेल्याचा संशय असून, ते रशियात असल्याची जोरदार चर्चा आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात राज्य सरकारने 'लूकआऊट' नोटीस काढली असल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे सिंग आता तपास यंत्रणांना सापडेनासे झाले आहेत. खुद्द तपास यंत्रणांनाच संशय आहे की, ते देश सोडून फरार झाले आहेत. कारण, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयएने) ऑगस्ट महिन्यामध्ये अनेकदा सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मात्र, तरीदेखील सिंग चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे नेमके परमबीर सिंग गेले कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
हेही वाचा :