राशिवडे येथे चित्रा वाघ यांची सुरक्षारक्षकाच्या मुलीच्या बारश्याला हजेरी | पुढारी

राशिवडे येथे चित्रा वाघ यांची सुरक्षारक्षकाच्या मुलीच्या बारश्याला हजेरी

राशिवडे (कोल्हापूर); प्रवीण ढोणे : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज येळवडे (ता. राधानगरी) या गावात आपल्या सुरक्षारक्षकाच्या मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सौ. वाघ यांचं गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका सामान्य, गरीब शेतक-याच्या घर यावेळी गजबजले होते. आजच्या बारशाच्या कार्यक्रमात चित्रा वाघ यांना बाळाच्या आत्याचा मान देण्यात आला.

येळवडे येथील अंजली शेळके यांच्या घरात नातीचे आज बारसे झाले. पहिल्या मुलीचे प्रज्ञाचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले. ठिकपुर्ली येथील पोलिस दीपक पाटील हे त्यांचे जावई. त्यांच्याकडे सध्या चित्रा वाघ यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. आपले सुरक्षारक्षक दीपक यांना मुलगी झाल्याचे कळताच तिच्या बारशाला येण्याचे सौ. वाघ यांनी निश्चित केले आणि त्यांनी आज गावातल्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

कार्यक्रमाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. यावेळी चित्रा वाघ यांचे लल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सौ. वाघ या दुपारी येताच त्यांचे औक्षण करून स्वागत झाले. घरात येऊन ‘आत्या’  चित्रा वाघा यांनी चिमुकलीला मांडीवर घेतले. ‘बेटी म्हणजे धनाची पेटी… असे सांगून तिचे ‘श्रीजा’ असे नामकरण त्यांनी केले. या कार्यक्रमात पाटील आणि शेळके कुटुंबीय यांचे मोजकेच पाहुणे सहभागी झाले होते.

Back to top button