सातारा : सोसायटी गटातून बाळासाहेब पाटील यांनी लढावे, कार्यकर्त्यांची मागणी | पुढारी

सातारा : सोसायटी गटातून बाळासाहेब पाटील यांनी लढावे, कार्यकर्त्यांची मागणी

मसूर (सातारा); पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कराड तालुका सोसायटी मतदारसंघामधून राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात कराड तालुका  सर्वात मोठा व इतर संस्थांचे विस्तृत जाळे असलेला तालुका आहे. त्यामुळे राखीव प्रवर्ग गटामधूनही जास्तीत जास्त प्रतिनिधित्व कराड तालुक्याला द्यावे, अशी एकमुखी मागणी कराड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मसूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज केली.

दरम्यान, कराड तालुका सोसायटी गटातून सोमवारी पहिल्याच दिवशी स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवल्यास कराड तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे होते. राष्ट्रवादीचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष देवराज पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, माजी उपसभापती सुहास बोराटे, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, अशोकराव पाटील पार्लेकर, सह्याद्रीचे कारखान्याचे संचालक पै. संजय थोरात, लहुराज जाधव, माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील, माजी पंचायत समिती सदस्य महिपतराव चव्हाण, डॉ. विजयराव साळुंखे, मसुरचे सरपंच पकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, डी. बी. जाधव, गोपाळराव धोकटे, प्रा..कादर पिरजादे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानसिंगराव जगदाळे म्हणाले, राज्याचे सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचा कराड तालुका सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरावा. त्यांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत. त्यामुळे राखीव प्रवर्ग गटामधूनही जास्तीत जास्त प्रतिनिधित्व कराड तालुक्याला मिळावे, अशी सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखी मागणी केली.

दरम्यान जिल्हा बँक सक्षम करण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील, माजी सहकारमंत्री यशवंतराव मोहिते, स्व. पी. डी. पाटील, भिकूनाना किवळकर आदी मान्यवरांनी बँक स्थापनेत पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून जिल्हा बँक सक्षम व बळकट झाली. यामध्ये कराड तालुक्याचा सिंहाचा वाटा असून सर्वात जास्त आर्थिक व्यवहार हे कराड तालुक्यातूनच होतात. तालुक्यात सहकारी संस्था, पाणी पुरवठा संस्था, गृहनिर्माण संस्था, सहकारी बँका यांचे मोठे जाळे असणारा मतदार हा संघ आहे म्हणूनच येथे जास्तीत जास्त राखीव प्रवर्ग गटास प्रतिनिधित्व मिळावे. कराड तालुका हा स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा आहे. तसेच सर्व कराड तालुका सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने एकसंघ आहे. त्यामुळे ते निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य आहे. सातारा जिल्हा बँकेत सर्वाधिक आर्थिक स्त्रोत या तालुक्याचा असून मतदानही सर्वाधिक असल्याने आम्ही ना. बाळासाहेब पाटील यांचा अर्ज सोसायटी मतदारसंघातून निश्चित करत असून यासह राखीव प्रवर्ग गटाचेही जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावे व आत्तापर्यंतचा बॅकलॉक भरून काढावा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी सुरेशराव माने, भाऊसाहेब चव्हाण, संपतराव जाधव, हंबीरराव जाधव, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, माजी सभापती शालन माळी, नामदेव साळुंखे, अशोकराव पाटील, तानाजीराव जाधव,  संजय घोलप, सुनील पाटील, मानसिंगराव जाधव, फत्तेसिंह जाधव, प्रकाश चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, सोमनाथ पवार, भीमराव इंगवले, अशोक सूर्यवंशी, सुनील पोळ, व्ही.एम. पोळ, आत्माराम घोलप, शिवाजी पाटील, सुरेश शिंदे, संभाजी शिंदे, दत्तात्रय शेलार, अनिल चव्हाण,  जयसिंग चव्हाण, प्रकाश चव्हाण,  जयवंत मानकर, रामदास पवार, किशोर पाटील, नेताजी चव्हाण आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मसूर ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी मानले.

Back to top button