Latest

Aditya-L1 Mission | सूर्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे, आदित्य एल-१ ने पार केली चौथी कक्षा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात भ्रमण करणाऱ्या आदित्य एल-१ चे पृथ्वीभोवतीचे चौथे ऑर्बिट मॅन्यूव्हर शुक्रवारी पहाटे यशस्वीपणे पार पडले. आता हे अंतराळ यान २५६ किमी x १२१९७३ किमीच्या कक्षेत पोहोचले असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने X वरुन पोस्ट करत दिली आहे.

मॉरिशस, बंगळूर, SDSC-SHAR आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्रोच्या ग्राउंड स्टेशन्सनी या ऑपरेशन दरम्यान उपग्रहाचा मागोवा घेतला. तर आदित्य-L1 साठी फिजी बेटांवर तैनात असलेले ट्रान्सपोर्टेबल टर्मिनल पोस्ट-बर्न ऑपरेशनसाठी सपोर्ट देईल. आदित्य एल-१ चे पुढील मॅन्यूव्हर १९ सप्टेंबर रोजी सुमारे २ वाजता पार पडणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.

 संबंधित बातम्या

याआधी आदित्य एल-१ ने ३, ५ आणि १० सप्टेंबर रोजी पृथ्वीभोवतीची अनुक्रमे पहिली, दुसरी आणि तिसरी कक्षा यशस्वीरित्या पार केली आहे. सुमारे चार महिने हा उपग्रह अंतराळात प्रवास करत राहणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये असणार्‍या एका लॅग्रेंज पॉईंटवर तो ठेवण्यात येईल. हा पॉईंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे. हे अंतर चंद्राच्या तुलनेत चार पटींनी अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी 'आदित्य एल-१'ला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल, असा 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून 'इस्रो' सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करणे 'इस्रो'ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास 'आदित्य एल-१' करणार आहे. त्याखेरीज सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील, अशी अपेक्षा आहे. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल माहिती मिळेल. 'आदित्य एल-१'चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्‍या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. 'चांद्रयान-३'प्रमाणेच 'आदित्य एल-१' सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्‍या मारेल. त्यानंतर १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून 'एल-१' पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्‍या मारताना 'आदित्य एल-१' सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT