

पुढारी ऑनलाईन डेस्क : कामं रखडू नये म्हणून आम्ही वारंवार आढावा घेतो, याचा अर्थ असा नाही की आम्ही निर्णय बदलला. त्यामुळे माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी भूखंडासंदर्भात केलेल्या आरोपांशी माझा काही संबंध नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मीरा बोरवणकर यांच्या आरोपांसंदर्भात मुंबई येथे आज (दि.१७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Ajit Pawar Vs Meera Borwankar)
पुण्यातील पोलिस दलाच्या ताब्यातील जमीन लिलावाद्वारे विकून ती एका खासगी व्यक्तीच्या ताब्यात सोपविण्याचा पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न होता. तो आपण हाणून पाडला, असा गौप्यस्फोट पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. मात्र बोरवणकरांचा हा दावा फेटाळून लावत, भूखंडाशी माझा संबंध नाही असा प्रतिदावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. (Ajit Pawar Vs Meera Borwankar)
पुढे अजित पवार म्हणाले, माझ्यावरील आरोपांना मी फारसं महत्त्व देत नाही. त्या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे मी पुन्हा पाहिली. पण त्या जमिनीशी माझा संबंध नाही. त्या भूखंडाबद्दल मी कोणतीही कृती केली नाही. त्या आरोपांशी माझा काही संबंध नाही. भूखंडासंदर्भात त्यावेळी समिती नेमली होती. निर्णय होऊनही प्रकल्प रखडला होता, त्यामुळे मी केवळ विचारपूस केली होती. कुठलीही जागा परस्पर हस्तांतरित करता येत नाही. आजही ती जागा आहे तिथेच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भूखंडासंदर्भातील तत्कालिन शासन आदेशही पत्रकार परिषदेदरम्यान अजित पवार यांनी माध्यमांना वाचून दाखला. (Ajit Pawar Vs Meera Borwankar)
भूखंडासंदर्भातील कोणत्याही बैठकीला मी नव्हतो किंवा कुठेही कागदपत्रावर माझी सही देखील नाही. ही गृहविभागाची जागा होती, त्याचाशी माझा काहीही संबध नव्हता आणि यासंदर्भात सर्व निर्णय गृहविभागाच्या हातात होते. त्यामुळे या प्रकल्पाशी माझा कोणताही संबंध नसल्याचे पवार म्हणाले. माझी चौकशी झाली तरी याच्याशी माझा काही संबंध नाही. प्रत्येक अधिकाऱ्याशी नीट बोलत होतो. कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देखील मी हस्तक्षेप करत नाही, असेही पवार म्हणाले.
भिडे वाड्यात महात्मा जोतिबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी प्रयत्न सुरू होते. या निकालाने राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भिडे वाड्यातील त्यांचे स्मारक आता लवकरच उभा राहिल, असे देखील अजित पवार म्हणाले. यासाठी छगन भुजबळांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.