येरवड्यातील जागा हस्तांरित प्रकरणावर मीरा बोरवणकर यांचा नवा खुलासा, म्हणाल्या.. | पुढारी

येरवड्यातील जागा हस्तांरित प्रकरणावर मीरा बोरवणकर यांचा नवा खुलासा, म्हणाल्या..

पुढारी ऑनलाईन डेस्क : तत्कालिन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातील आरोपांमुळे येरवड्यातील जागेचा वाद निर्माण झाला आहे. मॅडम कमिशनर या पुस्तकातील येरवडा मधील जागा हस्तांतरित प्रकरणातील आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले. यानंतर मीरा बोरवणकर यांनी आज (दि. १६) दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी या प्रकरणाबाबत महत्त्वाचा खुलासा करण्यात आला.

मॅडम कमिशनर या पुस्तकातून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मीरा बोरवणकर यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी अजित पवार यांचे पुस्तकात नाव घेतले नसल्याचे सांगितले. बोरवणकर यांच्या या भूमिकेनंतर आता येरवडामधील जागा हस्तांतरित प्रकरण चर्चेत आले आहे.

मॅडम कमिशनर या पुस्तकाबाबत भूमिका स्पष्ट करत असताना बोरवणकर म्हणाल्या की, पुस्तक न वाचता माझ्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. शासकीय जागेवर बिल्डरची नजर असते. या पुस्तकात एकूण ३८ प्रकरणे आहेत. मी लिहीलेल्या मुद्यांवर ठाम असल्याचे सांगत कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

माझे पुस्तक प्रथम वाचा आणि त्यानंतर माझ्यावर आरोप करा, असंही बोरवणकर यावेळी म्हणाल्या. जमीन हस्तांतरित करण्याबाबतच्या या प्रकरणावर त्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडली आहे.

‘मॅडम कमिशनर’मध्ये मीरा बोरवणकर यांनी पवारांसंबंधी काय म्हटले आहे?

‘मॅडम कमिशनर’ या रविवारी प्रकाशित झालेल्या पुस्तकात बोरवणकरांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या येरवडा तुरुंगाजवळील पोलिस दलाच्या ताब्यातील तीन एकराच्या मोक्याच्या जागेचा तत्कालीन ‘दादा’ पालकमंत्र्यांच्या वतीने लिलाव करण्यात आला होता. लिलावाप्रमाणे या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यास मला पालकमंत्र्यांनी सांगितले. पण, मी त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकावला, असे बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

 

Back to top button