अमोल कीर्तिकरांविरुद्ध रवींद्र वायकर; शिंदे गटाकडून उमेदवारी निश्चित | पुढारी

अमोल कीर्तिकरांविरुद्ध रवींद्र वायकर; शिंदे गटाकडून उमेदवारी निश्चित

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली असताना त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाने माजी मंत्री रवींद्र वायकर यांना रिंगणात उतरविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत वायकर यांच्याशी सोमवारी चर्चा केली असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

शिवसेनेमध्येे फूट पडल्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रहाणे पसंत केले. या निष्ठेची पोचपावती म्हणून अमोल कीर्तिकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासमोर शिंदे गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होती.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातून अभिनेता गोविंदा, मराठी अभिनेते सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर तसेच माजी खासदार संजय निरुपम आदींची नावे चर्चेत आली होती. मात्र, त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. आता रवींद्र वायकर यांचे नाव पुढे आले आहे. वायकर यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला.

या मतदारसंघात वायकर यांचे असलेले प्राबल्य पाहता त्यांना उमेदवारी देऊन तुल्यबळ लढत उभी करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. वायकर हे 1992 ते 2012 असे सलग चार वेळा जोगेश्वरी पूर्वेचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेवर निवडून गेले आहेत. या कार्यकाळात त्यांनी चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. तर 2009 पासून सलग तीनवेळा ते जोगेश्वरीचे आमदार राहिले आहेत. त्यांनी फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री

म्हणूनही काम केले आहे.

सोमवारी रात्री उशिरा त्यांनी ठाणे येथील मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना उमेदवारीसाठी होकार दिल्याचे समजते. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होऊ शकते.

नाशिकचा पेच कायम

नाशिकची जागा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना सोडण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असले आणि स्वतः गोडसे यांच्याकडून तसे सांगण्यात येत असताना नाशिकचा पेच अद्याप कायम आहे. नाशिक सोडल्यास भाजपाने ठाण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी आपण या मतदारसंघातून लढणार नसलो तरी पक्षाकडे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक पर्याय आल्याचे सांगितले.

छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेला सुटली असून या ठिकाणी मंत्री संदिपान भुमरे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मात्र, नाशिकसह दक्षिण मुंबई, पालघरचा तिढा अजून शिल्लक आहे. त्यावर गुरुवारपर्यंत तोडगा काढला जाणार आहे.

उज्ज्वल निकम यांची चर्चा

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे आहे. विद्यमान खासदार पूर्ण महाजन यांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार नसल्याने भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना या ठिकाणी निवडणूक लढण्यास आग्रह केला जात आहे. मात्र शेलार दिल्लीत जायला तयार नाहीत. त्यांनी कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचे नाव पुढे केले आहे. मात्र भाजपश्रेष्ठी निकम यांच्या नावाला अनुकूल नाहीत. शेलार यांनीच निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह आहे.

Back to top button