Lok Sabha Election 2024 : देशभरात निवडणुकीच्या मैदानात चारशे राजकीय पक्ष; अपक्षांसाठी 190 निवडणूक मुक्तचिन्हे | पुढारी

Lok Sabha Election 2024 : देशभरात निवडणुकीच्या मैदानात चारशे राजकीय पक्ष; अपक्षांसाठी 190 निवडणूक मुक्तचिन्हे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेले देशभरातील सुमारे 400 राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे, या राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाने 190 मुक्तचिन्हे निवडली आहेत. मागील निवडणुकीवेळी ही संख्या 193 होती. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या 

543 जागांवर 7 टप्प्यांमध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. देशभरात आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भाजपा, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे सहा राष्ट्रीय पक्ष आहेत, तर महाराष्ट्रात मनसे, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांच्यासाठी राखीव निवडणूक चिन्हे आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पक्ष आणि अपक्षांसाठी 190 मुक्तचिन्हे जाहीर केली आहेत. यातील काही चिन्हे ही गमतीशीर आहेत.

राष्ट्रीय पक्षांमध्ये आम आदमी पार्टी चिन्ह झाडू, बहुजन समाज पार्टी हत्ती, भारतीय जनता पार्टी कमळ, भारतीय कम्युनिस्ट पार्टी विळा-हातोडा, काँग्रेस हाताचा पंजा आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे चिन्ह पुस्तक आहे. ( Lok Sabha Election 2024 )

राज्यातील प्रादेशिक पक्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिन्ह रेल्वे इंजिन, शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तुतारी वाजवणारा माणूस यांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवारांसाठी प्रसारित केलेल्या चिन्हांमध्ये चॉकलेट, बूट, पाकीट, नरसाळे, बादली, फ्रॉक, हेडफोन, स्टेथोस्कोप, भाला फेकणारा माणूस, मनुष्य समूह, ड्रिल मशीन, सायकल पंप, आईस्क्रीम, स्टेपलर, कागद पंच मशीन, टूथ ब्रश, नेल कटर, सुईदोरा, सीसीटीव्ही कॅमेरा, लिफाफा, वाळूचे घड्याळ. बाज, शटर, रिमोट, इंजेक्शन, पायमोजे, कुलर, पेट्रोल पंप मशीन,ग्रामोफोन, क्रेन, दुर्बीण,कचरा पेटी, माऊस,फुगा, ब्रेड या चिन्हांचा समावेश आहे.

Back to top button