गोंदिया : आमगावच्या जंगलात वणवा भडकला; ८ एकरातील वनसंपदा नष्ट | पुढारी

गोंदिया : आमगावच्या जंगलात वणवा भडकला; ८ एकरातील वनसंपदा नष्ट

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील देवरी वन विभागांतर्गत येत असलेल्या आदर्श आमगाव येथील जंगलात (ता. २७ ) दुपारच्या सुमारास वणवा लागल्याने ८ एकर जंगल परिसरातील वनसंपदा जळून नष्ट झाली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून सुमारे सहा तास परिश्रम करून या वनव्यावर नियंत्रण मिळविले.
देवरी तालुक्यातील आदर्श आमगाव येथील जंगलात विविध प्रजातीचे मौल्यवान वृक्ष असून बिबट, हरीण, काळविट, अस्वल आदी अनेक वन्यप्राणी आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास या जंगलात वणवा पेटल्याची माहिती वनविभाग देवरीला मिळाली. त्यानंतर देवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धात्रक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि झाडाच्या फांद्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, जोराचा वारा वाहत असल्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या. तथापि, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर ब्लोअरची मदत घेण्यात आली, तब्बल सहा तासांत या वणव्यावर नियंत्रण मिळविता आले. जंगलात आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण कळू शकले नाही. मात्र, या वणव्यात अंदाजे ८ – १० एकरातील वनसंपदा जळून नष्ट झाली आहे.

वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव….

जंगल परिसरात वणव्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वणवा कसा लागतो, हा चिंतनाचा विषय आहे. मात्र, वणव्यामुळे जंगलातील दुर्मिळ वनौषधी, वनस्पती नष्ट होत आहे. नैसर्गिक पानवठेही नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे.

Back to top button