बीड : गेवराई-शेवगाव राज्य मार्गावर धोंडराई कॅम्पनजीक भीषण अपघात | पुढारी

बीड : गेवराई-शेवगाव राज्य मार्गावर धोंडराई कॅम्पनजीक भीषण अपघात

धोंडराई; पुढारी वृत्तसेवा : गेवराई -शेवगाव राज्य मार्गावरील धोंडराई कॅम्प येथे तिहेरी अपघात झाला. आयशर टेम्पो, चारचाकी गाडी आणि बोलेरो पिकअपमध्ये हा अपघात झाला. गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमापूर रोडवर मालवाहू आयशर टेम्पोचा स्टेरींग राॅड तुटल्याने समोरुन येणाऱ्या बोलेरो पिक‌‌‌अप व चारचाकीच्या धडकेत बोलेरो पिक‌‌‌अप पलटी झाला. या अपघातात अंदाजे दहा ते बारा जण जखमी झाले असल्याची चर्चा आहे. जखमींमध्ये लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांचा सामावेश आहे. जखमींना गेवराई व बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गेवराईकडून उमापुरकडे जाणाऱ्या मालवाहू आयशर टेम्पोची समोरुन येणाऱ्या चारचाकी व पिकअपला जबर धडक झाली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमींना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढत त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी धोंडराई व धोंडराई कॅम्प परिसरातील विकास शिंदे, भागवत बरे,बालु साखरे,श्रिकांत गिते,अमोल गिते,अजय कदम,लल्लु जाधव,विलास शिंदे, यांच्या सह ग्रामस्थांनी मदत केली. तर धोंडराई येथील सरपंच शितल साखरे ह्या देखील अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी आल्या होत्या. अपघात रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडला असल्याने उपजिल्हा रुग्णालयात एकच धांदल उडाली होती. अपघाताचा आवाज एवढा भिषण होता की, संपूर्ण गाव जमा झाले होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. जखमींमधील सर्वजण वडगाव ढोक येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

१०८ रुग्णवाहिकेची तत्पर सेवा

अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी १०८ या टोल फ्री क्रमांकावर दिल्यानंतर उमापुर १०८ रुग्णवाहिकेचे चालक विशालकुमार पाखरे,डॉ रमीज शेख,व गेवराई १०८ रुग्णवाहिकेचे चालक चंद्रकांत गजभार व डॉ एकनाथ पवार यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी अपघात स्थळ गाठले व अपघातात जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Back to top button