Drug : उच्चभ्रू वस्त्यांमधील तरुणाई ‘स्कोअरिंग’साठी झोपडपट्ट्यांकडे | पुढारी

Drug : उच्चभ्रू वस्त्यांमधील तरुणाई ‘स्कोअरिंग’साठी झोपडपट्ट्यांकडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वेळ सायंकाळी सातची. टिंगरेनगर भागातल्या एका बैठ्या घरात गांजा मिळतोय, अशी टीप कॉलेजच्या काही मुलांच्या टोळक्याला लागते. ते दबकत तिथे पोहोचतात तर तिथे एक दृष्टिहीन, दिव्यांग माणूस बसलेला दिसतो. त्याला एक मुलगा म्हणतो, माल आहे का? त्यावर किती पाहिजे, असा प्रश्न येतो. उत्तर मिळताच पैसे दिले जातात अन् माल म्हणजेच गांजाच्या पुड्या घेऊन मुले तिथून सटकतात… पुण्याच्या टिंगरेनगरचा हा प्रसंग असला तरी तो प्रातिनिधिक आहे आणि शहराच्या अनेक भागांत गांजा सहज मिळतो आहे. कुठे टिंगरेनगरसारख्या भागातील घरात, तर कुठे ठरावीक पानटपर्‍यांवर त्यांच्या पुड्या असतात आणि त्या लपवून ठेवलेल्या असतात. ‘खर्‍या’ गिर्‍हाइकांची ओळख पटली की सौदा होतो. ‘पुढारी’च्या पाहणीत अशी काही ठिकाणे शहरात आढळली.

कॉलेजच्या मुलांना ही ठिकाणे माहिती असतील, तर पोलिसांना कशी माहिती नाहीत, असा सवाल काही नागरिक करतात.
शहरातील उच्चभ्रू असलेल्या विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क परिसराची पाहणी केली असता तिथेही गांजाची विक्री सुरू असल्याचे दिसून आले. या भागात कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तसेच नोकरी करणार्‍या तरुण-तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात विशेषत: आयटी क्षेत्रातील तरुणांचे प्रमाण मोठे आहे. त्या भागातील पबच्या तसेच हॉटेलांच्या बाहेर अमली पदार्थांचे विक्रेते म्हणजेच पेडलर उभे असल्याचे आढळते. गांजासारखा अमली पदार्थ सहजी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण व्यसनाधीन होत असल्याचे धक्कादायक वास्तव या प्रतिनिधीला आढळून आले.

तरुणांप्रमाणेच तरुणींमध्येही नशा करण्याचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येते. फॅशन म्हणून तरुणी या व्यसनाकडे वळतात आणि मैत्रीण व्यसन करते, मग आपण का मागे राहायचे, असा प्रश्न करीत इतर मुलीही या जाळ्यात अडकतात. त्यात काही मुलीदेखील नशेच्या आहारी गेल्या असून, त्यात महाविद्यालयीन तरुणी सर्वाधिक आहेत. कल्चरच्या नावाखाली मित्र-मैत्रिणीही घेत असल्याने शहरातील तरुणाई गांजाच्या आहारी जात आहेत. त्यामध्ये, अन्य नशांच्या तुलनेने स्वस्त व इतरांना लक्षात येणार नाही अशा गांजाला सर्वाधिक मागणी आहे. गांजा हा सहज उपलब्ध होत असल्याने त्याचे सेवन करणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

तुमच्या सूचना कळवा

व्यसन म्हणजे तंबाखू-सिगारेट आणि दारू ही पारंपरिक कल्पना कधीच मागे पडली आहे. गांजा, गर्द, चरस, मेफेड्रॉन अशा किमती आणि आरोग्याची धूळधाण करण्यात एकापेक्षा एक वरचढ असलेल्या पदार्थांचे सेवन तरुण पिढी करते आहे. याचे पुण्यातील चित्र आणि या व्यसनांच्या चक्रव्युहातून या तरुणांना बाहेर कसे काढायचे, या प्रश्नांची चर्चा ‘पुढारी’मध्ये या मालिकेद्वारे करण्यात येते आहे. या व्यसनांना आळा कसा घालता येईल, नागरिक, पोलिस, पालक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांच्या पातळीवरून नेमके काय करता येईल, याबाबत पुणेकरांच्या सूचनाही मोलाच्या ठरणार आहेत. आपल्या सूचना आपण दै. ‘पुढारी’ला 99239 31807 या क्रमांकावर व्हॉट्स अपद्वारे पाठवाव्यात. त्यांना प्रसिद्धी दिली जाईल.

चुकीच्या माहितीमुळे विळखा

चुकीच्या माहितीमुळे तरुणाई गांजाच्या चक्रव्यूहात इतर अमली पदार्थांपेक्षा गांजाचे व्यसन तरुणांमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून आले. एकतर इतर पदार्थांपेक्षा गांजाची किंमत कमी असते आणि तो सहज उपलब्ध होतो, हे कारण त्यामागे असल्याचे सांगण्यात आले. हे स्वस्त नशाच्या बहाण्याने गांजाकडे वळली असली, तरी त्याचे परिणाम तितकेच भयानक आहेत. सुरुवातीला हे दुष्परिणाम दिसत नसले, तरी भविष्यात ते अतिशय भयंकर असल्याचे जाणकार सांगतात. समाजात पसरत असलेल्या चुकीच्या माहितीमुळे तरुणाई मात्र गांजाच्या चक्रव्यूहात अडकते आहे.

तरुणाईमध्ये स्कोअरिंग शब्द झाला रूढ

गांजा आणण्यासाठी तरुणाईत ‘स्कोअरिंग’ शब्द रूढ झाला आहे. स्कोअरिंगला कोण जाणार म्हणजेच गांजा आणायला कोण जाणार, आज स्कोअर करूयात म्हणजे आज गांजा ओढूयात या शब्दांचा वापर तरुणांकडून करण्यात येत आहे. गांजा शब्द टाळण्यासाठी स्कोअर आणि माल या शब्दांचा वापर जास्त होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा

Back to top button