एक घटस्फोट असाही : सुनावणीच्या पहिल्याच दिवशी घटस्फोट मंजूर | पुढारी

एक घटस्फोट असाही : सुनावणीच्या पहिल्याच दिवशी घटस्फोट मंजूर

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेड न्यायालयाने अभूतपूर्व असा निकाल देत सुनावणीच्या पहिल्याच तारखेस घटस्फोट मंजूर केला. महत्वाची बाब म्हणजे श्री.राजा व सौ.राणी (नावे बदलली आहेत) यांचा दिनांक: १० मे २०२२ रोजी विवाह झालेला होता परंतु विवाहपश्चात एका महिन्यातच दोघांनाही परस्परांचे स्वभाव, आवडी-निवडी आणि आयुष्याविषयीचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्याचे निदर्शनास आलेले होते. मित्र, नातेवाईक यांनी दोघांची समजूत काढूनही दोघेही एकत्र न येण्याच्या निर्णयावर ठाम होते. यातच दोघांनीही परस्पर समझोत्याने विभक्त होण्याचा व्यवहारिक निर्णय घेतला. त्याबाबत त्यांनी खेड न्यायालयात कार्यरत वकील अँड. आकाश प.चोरडिया, अँड. ऐश्वर्या स.शेवकरी, अँड. दिपाली स.सहाने यांचेमार्फत १४ फेब्रुवारी २०२४ रोजी विवाह याचिका दाखल केलेली होती. त्यावर दिनांक २२ रोजी पहिली सुनावणी नेमण्यात आलेली होती.

या विवाहित दांम्पत्याचा समजूतदार पणाच्या भूमिकेस दाद देत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड तालुका एम.बी.पाटील यांनी एकाच दिवसात घटस्फोट मंजूर करत दोघांनाही वैयक्तित बंधनातून मुक्त केलेले आहे. बऱ्याचदा वैवाहिक वादापश्चात नवरा-बायकोची एकत्रित येण्याची इच्छा संपुष्टात येते परंतु अहंकार, एकमेकांविषयीचा राग तसेच घटस्फोटाची प्रक्रिया बऱ्यापैकी किचकट असल्यामुळे विवाहित दाम्पत्याचे तारुण्य वादातच निघून जाते. या बाबीची दखल घेऊन लवकरात लवकर घटस्फोट मंजूर करण्याचा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड एम.बी.पाटील यांचा निर्णय स्वागतार्ह आहे.

-अँड. आकाश पन्नालाल चोरडिया (अर्जदारांचे वकील)

हेही वाचा

Back to top button