बेळगाव : चंदगड, हुक्केरी सीमेवर हत्तींचा वावर | पुढारी

बेळगाव : चंदगड, हुक्केरी सीमेवर हत्तींचा वावर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव – चंदगड, हुक्केरी – चंदगड तालुक्याच्या सीमेजवळ हत्तीचा वावर असून सीमेवरील शेतकऱ्यांनी तसेच प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन चंदगड पाटणे वनक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांनी केले आहे.

बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवर बेकिनकेरे जवळील किटवाड तसेच कुदनुर, कालकुंद्री या ठिकाणी शुक्रवारी (दि. 23) व शनिवारी (दि. 24) असे दोन दिवस हत्तीचा वावर सुरू आहे. त्यामुळे हुक्केरी- चंदगड तसेच बेळगाव – चंदगड या सीमेवरील गावातील शेतकऱ्यांनी तसेच शिवारात काम करणाऱ्या शेतमजुरानी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. या हत्तीने परिसरात दहशत निर्माण केली असून 15 वर्षाहून अधिक काळ सदर हत्ती हा आजरा वनक्षेत्रामध्ये संचार करत आहे.

शुक्रवारी (दि. 23) रात्री चिंचणे येथील वनक्षेत्रात सदर हत्तीचे आगमन झाले असून यानंतर शनिवारी बेळगाव तालुक्याच्या सीमेवरील किटवाड लघु बंधारे जवळ या हत्तीचा वावर होता. त्यामुळे दोन दिवस या परिसरात यात सदर चाळोबा गणेश या नावाच्या हत्तीची दहशत आहे. सदर हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी चंदगड पाटणे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, वनपाल जॉन्सन डिसूजा व नेताजी धामणकर यांच्यासह वनरक्षक आर. बी. पाटील, विश्वनाथ नार्वेकर यांचे पथक कार्यरत आहे. तर कोल्हापूर येथील वन खात्याच्या हत्ती हाकार गटाचे 20 कर्मचारी असे एकूण 30 कर्मचारी सदर हत्तीच्या मागावर लक्ष ठेवून आहेत. चंदगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नाईक यांच्या पथकानेही सदर हत्तीच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न केले.

Back to top button