Republic Day 2024 : कर्तव्यपथावर आज वैदर्भीय कलावंताचा राजमाता जिजाऊ, शिवरायांचा चित्ररथ | पुढारी

Republic Day 2024 : कर्तव्यपथावर आज वैदर्भीय कलावंताचा राजमाता जिजाऊ, शिवरायांचा चित्ररथ

नागपूर; राजेंद्र उट्टलवार : राजेंद्र उट्टलवार आज (दि. 26 जानेवारी) प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर तेलंगणा सीमेवरील वैदर्भीय कलावंतांनी साकारलेला ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजीमहाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. गेल्यावेळी साडेतीन शक्तीपीठ चित्ररथाची निर्मिती देखील याच यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील यशवंत एनगुर्तीवार आणि सहकारी कलावंताची होती हे विशेष. शिवछत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हे अप्रतिम शिल्प, चित्ररथ साकार झाले आहेत. (Republic Day 2024)

या चित्ररथाची निर्मिती पाटणबोरी येथील यशवंत एनगुर्तीवार यांच्या करखान्यातच झाली. गेले दहा-बारा दिवस राबून त्यांनी दिल्लीत ती शिल्पकृती पूर्ण केली. पहिली झलक आज गुरुवारी दिल्लीतील कर्तव्यपथावरील सरावात तालमीमध्ये अवघ्या देशाला बघायला मिळाली. चित्ररथ साकारणाऱ्या कलावंतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील कलावंतांचा मोठा वाटा आहे. ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजीमहाराज’ या विषयावरील या महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये शिवरयांचा लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे. या लक्षवेधी चित्ररथाच्या दर्शनी भागात बालशिवाजींसह माता जिजाऊंची प्रतिकृती पाहायला मिळते. तर, मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, न्यायाचा प्रतीक असलेला तराजू, छत्रपती संभाजी महाराज, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज आदी दृश्य आहेत. सोबतच, हिरकणी, दिपाऊ बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर महिलांच्या प्रतिकृतीदेखील यात आहेत.

चित्ररथ साकारण्यात यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार यशवंत एनगुर्तीवार (पाटणबोरी, जि. यवतमाळ) शिल्पकला विभागाचा प्रमुख आहे. तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) यांनी कलादिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. याशिवाय भूषण हजारे (कळंब) सूरज गाऊत्रे (सोनबर्डी, ता. केळापूर), पिंटू भोंग (पहापळ, ता. केळापूर), नीतेश बावणे (घाटंजी), अक्षय बावणे, योगेश वहिले, अविनाश बावणे, निखिल दुर्षेट्टीवार, अरुण मेश्राम, सुमोत कानके (सर्व रा. पाटणबोरी) आदी शिल्पकारांचा या निर्मितीसाठी महत्वाचा वाटा आहे. श्रीपाद भोंगाडे (हिंगणघाट, जि. वर्धा) हस्तकला विभाग प्रमुख आहे. केवळ दहा दिवसांमध्ये या चित्ररथातील शिल्प पाटणबोरी येथे साकारले. यवतमाळ जिल्ह्यात कलावंतांची खाण आहे. हा चित्ररथ उद्या प्रजासत्ताकदिनी हा चित्ररथ देशभरातील लोकांना बघायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी स्फुरण चढते.अशा शिवरायांचा चित्ररथ अचूक,प्रेरणादायी व्हावा यासाठी काहीसे दडपण असले तरी मावळ्यांमध्ये होती तशीच काहीशी स्वराज्यासाठी असणारी ऊर्जा आम्हालाही यानिमित्ताने जाणवली आणि छत्रपतींचा चित्ररथ तयार होत गेला अशी भावना यशवंत एनगुर्तीवार यांनी ‘पुढारी’ शी बोलताना व्यक्त केली.

१५ जानेवारीला दिल्लीमध्ये हे शिल्प पोहोचले उर्वरित काम दिल्लीत पार पडले. नृत्य, संगीत व पोशाखासह कर्तव्यपथावर तालीम पार पडली. महाराष्ट्रासह छत्तीसगड राज्याचा (बस्तरचा मुरिया दरबार) चित्ररथ साकारण्याची जबाबदारी देखील याच कलावंतांना मिळाली आहे.

शिवरायांची लोकशाही प्रतिबिंबित

भारताचा विकास, लोकशाही या विषयांना अनुसरून असलेल्या चित्ररथांचा समावेश यंदाच्या पथसंचलनामध्ये असणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून सहभाग अभिमानाची बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून चित्ररथ साकारणाऱ्या या समुहामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील या कलावंतांचा समावेश आहे. मागीलवर्षी महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तिपीठ’ चित्ररथासह उत्तरप्रदेश राज्यांचा ‘अयोध्येतील दीपोत्सव’ संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्याची जबाबदारी होती. महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरे तर उत्तरप्रदेशच्या चित्ररथाला तिसरे पारितोषिक प्राप्त झाले होते. (Republic Day 2024)

हेही वाचा

Back to top button