इंदापुरात पक्षांतरावरून तापले राजकारण : भाजप-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप | पुढारी

इंदापुरात पक्षांतरावरून तापले राजकारण : भाजप-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पक्षांतरावरून सुरू असलेले न्यायालयीन वाद  व त्यावर होणारे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण नित्याचे झालेले असतानाच इंदापूर तालुक्यातही आता त्याच तोडीचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते प्रशांत गलांडे- पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केल्याने चांगलेच वातावरण तापले आहे.
प्रशांत गलांडे पाटील यांच्या पत्नी निकिता  या गंगावळण ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आहेत,त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तुषार खराडे यांनी गलांडे पाटील यांच्यावर आरोप करत टक्केवारी घेणार्‍यांच्या टोळीत प्रवेश केल्याचा आरोप केल्याने आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू झाल्या आहेत.
आरोपाला प्रत्युत्तर देताना प्रशांत गलांडे पाटील यांनी देखील खराडे यांच्यावर शाब्दिक हल्ला करत चपला उचलून पदे मिळवण्याचा आरोप करत एकही युवक सोबत नसल्याने टीका करण्याची तुमची लायकी नसल्याचा पलटवार खराडे यांच्यावर केला. कार्यकर्त्यावर झालेली टीका भाजप इंदापूर कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील यांना चांगलेच लागल्याने त्यांनी देखील या वादात उडी घेत आमच्या कार्यकर्त्यांविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावे अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असे सुनावल्याने चांगलेच राजकारण तापले आहे.
 गंगावळण गावामध्ये एक वर्षापूर्वी भाजपची सत्ता आम्ही आणली; मात्र एक वर्षात एक रुपयाचाही निधी मिळाला नाही. आमच्या नेत्याला त्यांच्या मुलाबाळांचे पडलेले आहे. आम्हाला विश्वासात घेत नाहीत म्हणून भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
-प्रशांत गलांडे पाटील
प्रशांत गलांडे व त्यांच्या मूठभर सहकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तो गावच्या विकासासाठी नाही तर आर्थिक फायद्यासाठी केला आहे. टक्केवारी घेणारी टोळी चार-पाच वर्षांत फोफावली असून, ती टोळी निष्क्रिय आहे. त्यांच्या भूलथापांना ते बळी पडले आहेत.
-तुषार खराडे  अध्यक्ष,भाजप युवा मोर्चा इंदापूर तालुका
आमच्या कार्यकर्त्यांविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावे. आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असून, आमच्या कार्यकर्त्यांविषयी बोलताना स्वतःचे तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर जशास तसे उत्तर मिळेल. आम्ही आजपर्यंत निष्ठावंत लोकांनाच पदे दिली आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसर्‍या पक्षात प्रवेश करणार्‍यांसाठी नव्हे.
– राजवर्धन पाटील, भाजप कोअर कमिटी अध्यक्ष, इंदापूर तालुका
हेही वाचा

Back to top button