राज्यात ‘यूथ सहकार’ कायदा बदलासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

राज्यात ‘यूथ सहकार’ कायदा बदलासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात झालेले विविध बदल हे सहकारामुळेच निर्विवादपणे झाले आहेत. केरळसारख्या राज्यात युथ को-ऑपरेटिव्ह सोसायट्या यशस्वी होत असेल, तर महाराष्ट्रातही तरुणांना सहकारात संधी देण्यासाठी ‘युथ सहकार’साठी कायद्यात योग्य ते बदल करण्यात येतील. त्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेऊन सहकारातून येणार्‍या सूचनांवर कॅबिनेटमध्ये एकमताने निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.

पुणे मर्चंट्स बँकेच्या शतक महोत्सवी पदार्पण सोहळा आणि बोधचिन्हाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.19) सायंकाळी अरण्येश्वर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूल येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आमदार सुनील टिंगरे, बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, उपाध्यक्ष सुधीर शेळके, अंकुश काकडे, संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते. शहरातील काही सहकारी बँकांच्या प्रमुखांनी लोकांकरिता बँक न चालविता मूठभर लोकांसाठी चालविल्यावर काय घडू शकते, हे आपण पाहिले. अशा लोकांमुळे सहकारातील बँकांची बदनामी होते आणि सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतात, हेसुध्दा चुकीचे आहे, असे नमूद करून ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत सहकारात काम करीत असताना सहकाराला कमीपणा येईल अशाप्रकारचे कृत्य अधिकारी, कर्मचारी अथवा संचालक मंडळाकडून होता कामा नये.

त्यासाठी खबरदारी सर्वांनी घेऊन सहकाराला मजबूत करून पुढे नेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार पाठीशी उभे राहील. पुणे मर्चंट्स बँकेने त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम ठेवल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. विद्याधर अनास्कर म्हणाले, जग हे आता स्मार्ट बँकिंगचे झाले पाहिजे आणि पारंपरिक व स्मार्ट बँकिंगचा योग्य मेळ घालण्यासाठी आयटी इंजिनिअर, तरुणांसाठी संचालक मंडळात काही जागा असाव्यात. केरळमध्ये युथ को-ऑपरेटिव्ह यशस्वी झाले असून, राज्यातही तसे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि शतकमहोत्सवी पदार्पण सोहळ्यास उपस्थित असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शतकमहोत्सवी सांगता समारंभास राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

वयस्कर लोक तरुणांना संधीच देत नाहीत..!

महिलांच्या बँकेप्रमाणेच तरुणांची सहकारी बँक करण्यात अडचण येणार नाही. तसे केल्याशिवाय तरुणांनासुध्दा तशी संधीही मिळणार नाही. तसं तर वयस्कर लोक तरुणांना संधीच देत नाही. काय अंकुशराव…. बरोबर ना? असे बँकेचे ज्येष्ठ संचालक अंकुश काकडे यांना संबोधताच सभागृहात एकच हशा पिकला. आम्ही सहकारात एकदा गेल्यानंतर लोक जोपर्यंत आम्हाला रिटायर्ड करीत नाहीत, तोपर्यंत पदच सोडत नाहीत, असेही ते म्हणाले. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी पुन्हा एकदा टीका केल्याची चर्चा रंगली.

हेही वाचा

Back to top button