मोस्ट वाँटेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; अधिकारी जखमी | पुढारी

मोस्ट वाँटेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; अधिकारी जखमी

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-ठाणे जिल्ह्यात पोलिस असल्याची बतावणी करून पादचाऱ्यांना लुटणाऱ्या एका मोस्ट वाँटेड गुन्हेगाराला उचलण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) दुपारी मुंबई पोलीस दलातील डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे पथक कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी कबिल्यात घुसले. ३५ गुन्ह्यांची शिरावर मालिका असलेल्या फिरोझ खानला पोलिसांनी उचलल्याची खबर वाऱ्यासारखी पसरताच या कबिल्यातील त्याच्या हस्तकांसह सारेच पोलिसांच्या गाड्यांवर तुटून पडले. पोलिसांच्या तावडीतून सोडविताना केलेल्या तूफान दगडफेकीत एक अधिकारी जखमी झाला. इराणी कबिल्यातील सलूनमध्ये दाढी करण्यासाठी बसलेल्या गुन्हेगाराला उचलण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केल्यामुळे आंबिवलीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

फिरोजच्या शिरावर 35 गुन्ह्यांची मालिका

फिरोझ फय्याज खान असे अटक करण्यात आलेल्या मोस्ट वाँटेड गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात एकूण 35 गुन्हे केले आहेत. या भागातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलीस असल्याची बतावणी करुन तो पादचाऱ्यांना लुटायचा. काही दिवसापूर्वी अंधेरी येथील किशन बसवराज (21) या तरुणाला फिरोझ आणि त्याच्या दोन साथीदारांनी पोलिस असल्याची बतावणी करून त्याच्याकडील एक लाख रुपये लुटले होते. किशन हा नोकरदार आहे. त्याच्या तक्रारीवरून या प्रकरणी मुंबईतील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

कबिल्यावर पाळत ठेवून लावला सापळा

पोलिसांनी अंधेरीत घटना घडलेल्या आझाद नगर मेट्रो स्थानकाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात लुटारू फिरोझ हा ठाणे, मुंबई भागात चोऱ्या-लुटमार करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. हाच फिरोझ आंबिवलीतील इराणी कबिल्यात चोरी-छुपे राहत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डी. एन. नगर पोलिसांनी इराणी कबिल्यावर पाळत ठेऊन फिरोझला पकडण्यासाठी गुप्त सापळा लावला होता.

फिरोजला उचलण्यासाठी खासगी वाहनांचा वापर

फिरोझ मंगळवारी दुपारी दाढी करण्यासाठी घराबाहेर पडणार असल्याची खासगी गुप्तहेरांकडून पोलिसांना मिळाली होती. एका बुरखाधारी महिला पोलिसाने पोलिसांना इशारा केला. त्याप्रमाणे पोलिसांनी कबिल्यातील एका सलून बाहेर सापळा लावला होता. तो सलूनमध्ये येऊन बसताच विद्यार्थी वाहक ओमनी व्हॅन आणि टपालवाहू व्हॅनसारखी दिसणारी लाल रंगाची गाडी घेऊन पोलिसांचे पथक इराणी कबिल्यात घुसले. यावेळी फिरोज आपल्या साथीदारांसह एका सलूनमध्ये दाढी करण्यासाठी बसला असतानाच पोलिसांनी दुकानाला चारही बाजुने घेरले. पोलिसांनी अचानक झडप घालून फिरोझला पकडले आणि सोबत आणलेल्या व्हॅनमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला.

हल्लेखोरांचा मनसुबा उधळताना अधिकारी जखमी

आता आपण जाळ्यात अडकलो आहोत याची खात्री पटताच पकडले फिरोजने पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी हिसका देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मनसुबा पोलिसांनी उधळून लावला. फिरोझला पकडताच सलून बाहेरील साथीदारांनी दोन्ही व्हॅनला घेरले. मात्र दोन्ही वाहने पोलिसांनी वेगाने पुढे नेताच हिंसक इराण्यांनी तुफान दगडफेक करून फिरोझला पोलिसांच्या तावडीतून सोडवून नेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हल्लेखोरांचा मनसुबा उधळून लावला. या हल्ल्यात एका अधिकाऱ्याच्या डोक्याला दगडाचा फटका बसला. यात हा अधिकारी जखमी झाला

पोलिसांचा रेल्वे फाटकापर्यंत पाठलाग

फिरोझला पोलिसांनी उचलल्याची खबर कबिल्यात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांच्या गाड्या इराणी कबिल्यातून बाहेर पडत असताना फिरोजच्या हस्तकांसह स्थानिक इराण्यांनी फिरोझला सोडविण्यासाठी हातात दगडी घेऊन रेल्वे फाटकापर्यंत पाठलाग केला. परंतु पोलिस सुसाट वेगाने आपल्या गाड्या घेऊन कबिल्यातून बाहेर पडले. पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करणाऱ्या हिंसक जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

स्थानिक पोलिस कारवाईपासून अनभिज्ञ

सराईत गुन्हेगारांना उचलण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर यापूर्वी देखील अशाच पद्धतीने हिंसक हल्ले झाल्याच्या घटना घडल्याचे खडकपाडा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले, मुंबई पोलिस आम्हाला कोणतीही माहिती न देता या कबिल्यात गेले होते. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड स्थानिकांनी केली. याप्रकरणी अद्याप तक्रार देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कुणीही आले नसल्याचेही पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

जामीन मुक्तीनंतर गुन्ह्यांची पुनरावृत्ती

वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे हा इराणी कबिला लुटारू-चोरट्यांचे आश्रयस्थान म्हणून नेहमीच पोलिसांच्या रडारवर असतो. कबिल्यात लपलेल्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांकडून तेथे अनेकदा कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. अनेक आरोपींना गजाआड केले. मात्र जामिनावर सुटून आल्यानंतर हे गुन्हेगार पुन्हा आपल्या कारवाया सुरु करतात. अनेकदा कोम्बिंग ऑपरेश दरम्यान पोलिसांवर हल्ले करण्यात आले आहेत. हे गुन्हेगार कल्याण-डोंबिवलीसह मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये धुमाकूळ घालत असून त्यांच्या कारवायांमुळे पोलिस यंत्रणाही चक्रावली आहे.

Back to top button