सातारा : वसुबारसने दीपोत्सवाला आज प्रारंभ | पुढारी

सातारा : वसुबारसने दीपोत्सवाला आज प्रारंभ

सातारा : प्रतिनिधी

कोरोनाच्या कटू आठवणी मागे सारत सोमवारपासून दीपोत्सवाला प्रारंभ होत आहे. दिवाळीची धामधूम शिगेला पोहोचली असून, पूर्वसंध्येला अवघ्या सातार्‍यात दिवाळीचा माहोल पहायला मिळाला. आता पुढील काही दिवस अवघं जनजीवन दीपोत्सवाने न्हावून निघणार असून, दीपोत्सवाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे.

दिवाळी, धनत्रयोदशी, नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा हा उत्सव सोमवार दि. 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

वसुबारसेने दीपोत्सवास प्रारंभ होत असल्याने अवघे जनजीवन उत्साही झाले आहे. यावर्षी मंगळवार दि. 2 रोजी धनत्रयोदशी, गुरुवार दि. 4 रोजी अभ्यंगस्नान, नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन, शुक्रवार दि. 5 रोजी दिवाळी पाडवा आणि शनिवार दि. 6 रोजी भाऊबीज असा दीपोत्सव साजरा होत आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. घरोघरी दीपोत्सवाच्या माहोलाला आणखी उधाण येणार आहे. घरोघरी दिवाळी फराळ करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. अनेकांनी मात्र आघाडी घेतली असून आता बच्चे कंपनीला फटाके फोडण्याचे वेध लागले आहेत.

शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेसह उपनगरातील दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड उडाली होती. सुट्टीचा योग साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे बाजारपेठ फूलून गेली होती. सातारा शहरासह उपनगरातील प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

‘घरोघरी, दारोदारी, दीपावलीचा आनंदोत्सव, मनामनातून सार्‍यांचा, आज अनोखा हर्षोत्सव, चला पेटवा दीप नवे स्नेहाचे अन उत्साहाचे, मनोमनी, सार्‍यांचे राहो नाते हे मांगल्याचे, शुभ दिपावली’?अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात आहेत.

Back to top button