सोलापूर : करमाळा,माढा, माळशिरस तालुक्याचे सिंचन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन | पुढारी

सोलापूर : करमाळा,माढा, माळशिरस तालुक्याचे सिंचन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

अकलूज, पुढारी वृत्तसेवा :  करमाळा ,माढा आणि माळशिरस तालुक्यातील रखडलेल्या सिंचन योजना तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी धोरण हाती घेतले जाईल. त्याशिवाय नव्याने राबवण्यात येणाऱ्या योजना व जुन्या सिंचन योजनांच्या दुरुस्त्या तातडीने करून या तिन्ही तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागतील अशी ग्वाही जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. कृष्णा -भीमा स्थिरीकरण संदर्भातही या बैठकीत जोर लावण्यात आला. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकारातून करमाळा ,माढा आणि माळशिरस या तीन तालुक्यांच्या सिंचन प्रश्नां संदर्भात पुणे येथे सिंचन भवन मध्ये विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीत आ. रणजितसिंह मोहिते पाटील , आ. राम सातपुते ,माजी आ. नारायण पाटील ,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व तीन्ही तालुक्यातील पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत मांगी तलाव, कुकडीचे पाणी , निरा देवघर धरणाचे पाणी ,सिनेवरील सिंचन योजना यासंदर्भात अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा खल झाला. मांगी तलावाला कुकडीच्या लाभक्षेत्रात समाविष्ट करावे, दहीगाव सिंचन योजनेची अपूर्ण कामे लवकर पूर्ण व्हावीत , कुकडीचे पाणी करमाळ्याला टेल पर्यंत मिळावे ,सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये माढा व करमाळा तालुक्यातील नाडी ,रोपळे ,बिटरगाव परिसरातील गावांचा समावेश व्हावा.

कृष्णा – मराठवाडा प्रकल्पाच्या जेऊर बोगद्यातून करमाळा तालुक्यातील गावांना पाणी मिळावे . सिना नदीवर आलेगाव व रीदोरे येथे बॅरेज व भिमेवर सुस्ते येथे बॅरेज बांधावे . सिना माढा सिंचन योजनेतून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे ,माढा तालुक्यातील पाण्यापासून कायम वंचित धानोरे व परिसरातील गावांना पाणी मिळावे यासाठी सर्वे करून प्रस्ताव पाठवण्याचे धोरण ठरले. जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी पाठवलेले प्रस्ताव आपण मंत्रालय स्तरावर मंजूर करून घेऊ असा शब्द आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिला.

आष्टी उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ४८ कोटींचा निधी मंजूर आहे .या योजनेसाठी आणखी १२५ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचे बैठकीत ठरले .माळशिरस तालुक्यात जलसंपदा विभागाकडून मेकॅनिकल सबडिव्हिजन मंजूर होण्यासाठी आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांनी जोर धरला . त्यावर तालुक्यासाठी असे सबडिव्हिजन देण्यात येईल असे अतुल कपोले यांनी सांगितले.

हेही वाचंलत का?

 

Back to top button