गोव्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी बहरले | पुढारी

गोव्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी बहरले

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा ; कोरोना महामारीमुळे मंदीत आलेला पर्यटन व्यवसायाला बहर आला आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कळंगुट, कांदोळी, हणजूण, वागातोर येथील समुद्रकिनान्यावर देशी पर्यटकांनी मोठया गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्री १० नंतर संगीत वाजविण्यावर निर्बंध घातल्याचा काहीसा परिणाम पर्यटनावर झाला असला तरी उत्तरेत येणाऱ्या पर्यटनांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. रात्रीच्या नसल्या तरी सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत पार्ट्यांचे आयोजन होत आहे.

डिसेंबर हा राज्यातील पर्यटन हंगामाचा सर्वात महत्त्वाचा महिना आहे. वर्षभरात जेवढे पर्यटक गोव्यात येतात त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त पर्यटक याच महिन्यात गोव्याला भेट देतात. कारण या महिन्यात संगीत रजनी सारखे पर्यटकांना आकर्षित करणारे उपक्रम आयोजित केले जातात.

पर्यटन हंगामाला सुरूवात झाल्यामुळे किनारी भागातील हॉटेल, गेस्ट हाऊस भाड्याने देण्यात येणाऱ्या खोल्या, व्हिला यांचे दर दुप्पट झालेत. आगाऊ बुकिंगमुळे जानेवारीच्या पाच तारखेपर्यंत बहुतेक हॉटेल्स फुल्ल झाल्याचे सांगण्यात येते. गोव्यात येण्याकरिता बसेसचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पर्यटक सांगतात.  पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी येथील हॉटेलमधील दर प्रति दिवस दोन ते अडीच हजार रुपये होते, तेच आता चार ते पाच हजारपर्यंत करण्यात आले आहेत, गेस्ट हाऊसमध्ये एक ते दीड हजार रुपये दिवसाला भाडे आकारले जात होते. ते आता अडीच ते तीन हजार रुपये झाले आहे.

स्विमिंग पूल असलेल्या हॉटेलचा दर प्रति दिवस आठ ते दहा हजार रुपये असल्याचे पर्यटक सांगतात, स्विमिंग पूल असलेल्या खासगी व्हिलासाठी दिवसाला रांगा लागलेल्या असून १५ ते २५ हजार भाडे घेतले जाते.

किनारी भागात वाहतूक कोंडी

सध्या पर्यटक बस, विमान व रेल्वेतून येत आहेत. पण खाजगी वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यातील नोंदीकृत वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे येथील रस्त्यावर मोठा ताण पडत आहे. किनारी भागात वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रकारे नित्याचेच झाले आहे. कळंगुट किनारी भागातील रस्त्यांवर तार वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.

Back to top button