औरंगाबाद : दसरा मेळाव्यासाठी ‘एसटी’ बसेस जाणार मुंबईला; प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय | पुढारी

औरंगाबाद : दसरा मेळाव्यासाठी 'एसटी' बसेस जाणार मुंबईला; प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय

पैठण; चंद्रकांत अंबिलवादे : शिवसेनेच्या दोन गटांनी प्रतिष्ठित केलेल्या मुंबई येथील दसरा मेळाव्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या बसेस सलग तीन दिवस मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशासह विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन तारांबळ उडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अस्तित्वासाठी प्रतिष्ठित केलेल्या मुंबई येथील दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी शिंदे गटातील मंत्र्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या ५०० हून अधिक बसेस आरक्षित केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील आगारातून या बसेस दसरा मेळाव्याला मुंबईला सोडल्या जाणार आहेत.

पैठण आगारातून १६५ बस मुंबईसाठी पाठविण्यात येणार आहेत. वास्तविक पाहता पैठण आगारांमध्ये फक्त एकूण ६० बस कार्यरत आहेत. जवळच्या तालुक्यातून या ठिकाणी इतर बस मागवण्याचे नियोजन सुरू आहे. मुंबईला जाण्यासाठी चांगल्या प्रकाराच्या व नवीन बस उपलब्ध करून देण्याचा आदेश वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास न करू शकणाऱ्या बस पैठण आगारातून सुरू ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागामधील शाळा, महाविद्यालयाला तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी बस सेवा उपलब्ध राहणार नाही, अशा सूचना आगार प्रमुखांनी दिल्या आहेत. त्यामुळे या तीन दिवसाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना मोठा त्रास होणार आहे. तर पैठण येथून नाशिक, तुळजापूर, बुलढाणा, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, कोपरगाव, बारामती, बोईसर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवासांची मोठी गैरसोय होणार आहे.

दरम्यान, परिवहन विभागाच्या वरिष्ठाच्या आदेशानुसार मुंबईचा दसरा मेळाव्यासाठी जवळपास १६५ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या दरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या महाविद्यालयाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तीन दिवसाच्या दरम्यान लांब पल्ल्याच्या बस सेवा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल राज्य परिवहन महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन पैठण आगार प्रमुख सुहास तरवडे व स्थानक प्रमुख गजानन मडके यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button