चिकोडी तालुक्यातील ६ बंधारे पाण्याखाली | पुढारी

चिकोडी तालुक्यातील ६ बंधारे पाण्याखाली

चिकोडी : काशिनाथ सुळकुडे : महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सातारा, कोकण व कोयना धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात पाणी चिकोडी तालुक्यातील नद्यांना वाहून येत आहे. त्यामुळे चिकोडी तालुक्यातील कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून तालुक्यातील ६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस खात्याकडून त्या ठिकाणी बॅरिकेडस घालून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. चिकोडी तालुक्यातील नदी काठावरील नागरिकांमध्ये पुराची भीती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील ६ बंधारे पाण्याखाली :

कृष्णा नदीवरील कल्लोळ – येडुर बंधारा, मांजरी- बुवाची सौन्दत व दुधगंगा नदीवरील मलीकवाड – दत्तवाड, एकसंबा – दानवाड, तर निपाणी तालुक्यातील कारदगा – भोज, वेदगंगा नदीवरील भोजवाडी – कुनूर असे ६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सदर मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली आहे. तालुक्यातील वाहणाऱ्या दुधगंगा नदीची पाणी पातळी सदलगा येथे 533.250 मीटर तर 14 हजार 960 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कृष्णा नदीत शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातून 56 हजार 333 क्युसेक्स इतका विसर्ग येत आहे. चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीवरील कल्लोळ बंधाऱ्यातून 71 हजार 293 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तर अथणी तालुक्यातील हिप्परगी बंधाऱ्यातून 68 हजार विसर्ग सुरू आहे. तर पाणी पातळी 520.70 मीटर तर पाण्याचा साठा 2.50 टीएमसी इतका आहे. अलमट्टी जलाशयात 75207 क्युसेक्स इतके ब्याकवॉटर उपलब्ध आहे.

चिकोडी तालुक्यातील प्रमुख बंधारे व पुलाची पाणी पातळी :

1 अंकली – मांजरी ( कृष्णा नदी) :

धोकादायक पातळी – 537 मी
सध्या असलेली पातळी – 529.31मी

2 सदलगा ( दूधगंगा + वेदगंगा नदी )
धोकादायक पातळी – 538 मी,  सध्या असलेली पातळी – 533.25

3. हिप्परगी बंधारा – कृष्णा नदी

धोकादायक पातळी – 524.87
सद्या असलेली पातळी – 520.70 मी

चिकोडी तालुक्यातील पावसाचे प्रमाण :

चिकोडी : 4.5 मी मी, अंकली 2.4 मीमी, नागरमुणोळी 1.8 मीमी, सदलगा 1.6 मीमी, जोडट्टी 1.8 मीमी. इतक्या पावसाची नोंद 24 तासात झाली आहे.

प्रशासन सज्ज :

चिकोडी तालुक्यातील नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंती प्रशासन करीत आहे. तसेच तलाठी, पोलीस, अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, अधिकारी तालुक्यातील परिस्थितीतीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदी काठावरील शेतकरी विजेच्या मोटारी काढून सुरक्षित ठिकाणी हलवीत आहेत. तसेच शेतमळ्यातील जनावरे, चारा व साहित्य काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

एनडीआरएफ पथक सज्ज :

चिकोडी तालुक्यातील पूरस्थिती काळात नागरिकांच्या बचावासाठी 15 दिवसांपूर्वीच एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. सदलगा येथे पथक तैनात करण्यात आले असून आवश्यक असलेल्या ठिकाणी मदत कार्यासाठी हलविण्यात येणार आहे.

Back to top button