सांगलीत भरदिवसा बंगला फोडला | पुढारी

सांगलीत भरदिवसा बंगला फोडला

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील शामरावनगरमधील रवींद्र शिवराम करंजे (वय 51) यांचा बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व 41 हजारांची रोकड, असा एकूण साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रवींद्र करंजे 24 जूनरोजी सकाळी साडेअकरा वाजता कुटुंबासह सोलापूर येथे नातेवाईकांकडे गेले होेते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरचे लॉक तोडून त्यामधील विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने व 41 हजारांची रोकड, असा साडेसहा लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.
करंजे कुटुंब सोमवारी रात्री सोलापूरहून परतले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्‍वान करंजे यांच्या बंगल्यापासून खिलारे मंगल कार्यालयापर्यंत गेले. तिथेच ते बराच वेळ घुटमळले. यावरून चोरटे कोल्हापूर रस्त्याच्या दिशेने गेल्याचा अंदाज आहे.
ठसे तज्ज्ञांना चोरट्याचे ठसे मिळाले आहेत. त्याआधारे पोलिसांनी तपासला दिशा दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानेही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू ठेवली आहे. चोरटे हे स्थानिकच असावेत, असा संशय
आहे.
उघड्या घरातून मोबाईल, रोकड पळविली
जुना बुधगाव रस्त्यावरील कवठेकर प्लॉटमध्ये राहणार्‍या विद्या अंकुश कुकडे यांच्या उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी मोबाईल व पाचशे रुपयांची रोकड लंपास केली. सोमवारी मंगळवारी भरदिवसा ही घटना घडली. कुकडे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Back to top button