सातारा : शिरवळमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण; ३ पोलिस निलंबित | पुढारी

सातारा : शिरवळमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण; ३ पोलिस निलंबित

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : शिरवळ (ता. खंडाळा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याचे तीव्र पडसाद उमटले असून विद्यार्थ्यांनी कॉलेज गेटसमोर आंदोलन छेडले. दरम्यान, विद्यार्थांना बेदम मारहाण करणाऱ्या तीन पोलिसांसह एका होमगार्डला निलंबित करण्यात आले आहे. शिरवळ पोलीस ठाण्याचे एन. डी. महांगरे, बी. सी. दिघे, चालक धायगुडे व होमगार्ड नरुटे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, मारहाणीची घटना बुधवारी (दि.९) रात्री घडली आहे. विद्यार्थी आरडाओरडा करत असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाल्यानंतर संबधित चौघे पोलीस विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर गेले. काहीही माहिती न घेता पोलिसांनी दिसेल, त्या विद्यार्थ्यांना झोडपण्यास सुरुवात केली. दरवाजे, कड्या तोडून रूममध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली. यामुळे तब्बल १ तास गोंधळ उडाला.

याचे तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी सकाळी विद्यार्थी संतप्त झाले. पोलिसांचा निषेध करत कॉलेजच्या गेटबाहेर आंदोलन सुरू केले. पोलिसांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. या आंदोलनाची धार वाढत गेली. व राज्यात पाच ठिकाणी असलेल्या इतर पशु वैद्यकिय कॉलेजमध्ये बंद पुकारण्यात आला. याचवेळी समाज माध्यमावर विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचे फोटो व्हायरल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस दलातील संबधित चौघांना निलंबित करण्यात आले.

हेही वाचलंत का ?  

पहा व्हिडिओ : विधानसभा निवडणूक : भाजपाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव नेमका कशामुळे

Back to top button