मुंबई; पुढारी वृत्तसेवा: महिला अत्याचारांमध्ये भाजपची सत्ता असलेले उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी शाखेच्या २०२० सालच्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. याउलट मविआ सरकारच्या काळात मात्र, महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे, असा दावा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक या भाजपच्या राज्यांतही महिला अत्याचाराचे मोठे प्रमाण आहे. आसाममध्ये सर्वाधिक महिलांवर अत्याचार झाले. सामूहिक बलात्कार व खून या घटनांमध्येही उत्तर प्रदेश पुढे आहे. त्यानंतर भाजपाशासित मध्य प्रदेश व आसाम राज्यांचा क्रमांक लागतो,असे सावंत म्हणाले.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात २०१५ मध्ये ३१२१६, २०१६ साली ३१३८८, २०१७ या वर्षी ३१९७८ , २०१८ साली ३५४९७ तर २०१९ साली महिला अत्याचाऱ्याच्या ३७१४४ घटना घडल्या. फडणवीस सरकार हे महिलांसाठी कर्दनकाळ ठरले होते. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात २०२० साली महिला अत्याचारांच्या संखेत घट झाली, असा दावाही सचिन सावंत यांनी केला.
विशेष करून भाजप शासित राज्यांतील महिला अत्याचारांचे प्रमाण पाहता, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला भाजपाने पाठिंबा द्यावा, असा चिमटा सावंत यांनी काढला.
ठाकरे यांनी देशातील महिलांच्या हिताचा विचार करत विशेष अधिवेशन बोलवण्याची केलेली मागणी योग्यच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचलंत का?